नक्षली दाम्पत्याला अटक

0
11

बीएसएफ तळावरील हल्ल्यात होता सहभाग
वृत्तसंस्था
रायपूर-गेल्या आठवड्यात छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यातील छोटे बैठिया येथील सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) तळावर झालेल्या शक्तिशाली हल्ल्यात सहभागी असलेल्या नक्षली दाम्पत्याला पोलिसांनी आज शनिवारी अटक केली.
दासरू पुंगाटी उर्फ विक्रम आणि त्याची पत्नी निर्मला असे या नक्षली दाम्पत्याचे नाव आहे. महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यातील बुर्गी पिपली गावातून त्यांना अटक करण्यात आली. हे गाव महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवर आहे, अशी माहिती बांदे पोलिस ठाण्याचे प्रभारी नरेश देशमुख यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
दोन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागात हे नक्षली दाम्पत्य गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय आहे. सीआरपीएफ जवान आणि पोलिसांवरील हल्ल्यांसह विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग आहे. सध्या ते छत्तीसगडच्या बांदे भागात आपल्या कारवाया करीत आहे, असे त्यांनी सांगितले.
गेल्या १२ एप्रिल रोजी बांदे येथील बीएसएफच्या तळावर नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद आणि चार जवान जखमी झाले होते. दासरू आणि त्याच्या पत्नीचा या हल्ल्यात सहभाग असल्याचे प्राथमिक चौकशीत दिसून आल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक करण्यासाठी व्यापक शोधमोहीम हाती घेतली होती.