अमरावतीत साकारणार मिसाईल कारखाना

0
60

अमरावती-येथील औद्योगिक विकासासाठी आज राजधानी नवी दिल्लीत नवे पाऊल पडले. अमरावती येथे लवकरच मिसाईल निर्मिती कारखाना उभारण्यात येणार असून त्याची मुहूर्तमेढ आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात येत्या ऑगस्ट महिन्यात करण्यात येईल, असे आश्‍वासन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाला दिले. नवी दिल्लीस्थित संरक्षण मंत्रालयातील पर्रिकर यांच्या दालनात शुक्रवारल सकाळी पार पडलेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
तांत्रिक चाचणी पूर्ण झाल्याचा अहवाल आल्यानंतर त्वरित क्षेपणास्त्र निर्मिती करणार्‍या कंपनीची नियुक्ती केली जाणार आहे. संरक्षणविषयक कारखाना असल्यामुळे या प्रकल्पासाठी कौशल्याधारित मनुष्यबळाची आवश्यकता असल्याने कौशल्य विकासाची कामे तातडीने सुरू करा, जेणेकरून प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू होईल, त्यावेळी आवश्यक असलेले प्रशिक्षित मनुष्यबळ तयार राहील, अशी सूचना संरक्षणमंत्र्यांनी अधिकार्‍यांना केली.
बैठकीला संरक्षण सचिव (निर्मिती) जी. मोहन कुमार , संचालक (तांत्रिक) एन. बी. सिंग, सहसचिव (वित्त) जे. आर. के. राव, भारत डायनामिक्स लिमिटेडचे अध्यक्ष वि. उदयभास्कर, अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे, आमदार डॉ. सुनील देशमुख, डॉ. अनिल बोंडे, रवि राणा, यशोमती ठाकूर, रमेश बुंदिले, प्रभुदास भिलावेकर, श्रीकांत देशपांडे आदी उपस्थित होते.
अमरावतीनजीक असलेल्या नांदगाव पेठ औद्योगिक वसाहतीत २२४ हेक्टर्स जागेवर कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक आणि हजारांवर रोजगार निर्मितीची क्षमता असलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प भारत डायनामिक्स लिमिटेड (बीडीएल) उभारत असून या ठिकाणी कुंपणाचे काम सुरू झाले आहे, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाच्या वतीने देण्यात आली. कुठल्याही परिस्थितीत या प्रकल्पाचे काम मंदावणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेशही संरक्षणमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांना दिले. येत्या तीन महिन्यांत या संदर्भातील तांत्रिक चाचण्यांचा अहवाल द्यावा, अशी सूचनाही पर्रिकर यांनी केली. साधारणत: सात किमी अंतरावर मारा करण्याची क्षमता असलेल्या क्षेपणास्त्राची निर्मिती या कारखान्यात केली जाणार आहे. या प्रकल्पामुळे औद्योगिक वसाहतीसह जिल्ह्याचा कायापालट होणार आहे.