कोल्हापुर जिल्हापरिषदेला उत्कृष्ठ पंचायत पुरस्कार

0
12

नवी दिल्ली : पंचायतराज व्यवस्था हा देशाचा कणा आहे, त्याला अधिक मजबूत करण्याकरिता पंचायतराज विविध उपक्रम राबविते. याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त पंचायतराज व्यवस्थेमध्ये उत्कृष्ट कार्याबद्दल राज्याला ‘ई-पंचायतीचा’ आणि ‘राज्य हस्तांतरण निर्देशांक’(state Devolution index) या राष्ट्रीय पुरस्काराने पंतप्रधानाच्याहस्ते सन्मानित करण्यात आले. याशिवाय राज्यातील एकूण 20 जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींनाही सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाकरिता राज्यातून 92 प्रतिनिधी सहभागी झाले होते.

येथील विज्ञान भवनात शुक्रवारी 22 व्या ‘राष्ट्रीय पंचायतराज दिन’ कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय ग्रामविकास व पंचायतराज मंत्री बिरेंद्र सिंग, केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री निहाल चंद मेघवाल, सचिव एस.एम. विजयांनद, राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दिपक केसरकर, ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव वी. गिरीराज तसेच विविध राज्यातील ग्रामविकास मंत्री, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंतप्रधानाच्या हस्ते ‘डीव्हयॉल्युशन इन्डेक्स 2014-15’ या पुस्तकाचे विमोचन याप्रसंगी करण्यात आले. पंचायतराज संस्थामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष विमल पाटील, को्ल्हापुरचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा गोंदियाचे विद्यमान जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांनी पुरस्कार स्वीकारला.