अंदमान निकोबार बेट भूकंपाने हादरले

0
15

वृत्तसंस्था
पोर्ट ब्लेअर दि. १ – आसाम, नागालॅंड आणि ईशान्य भारतातील काही राज्ये भूकंपाच्या धक्क्याने हादरल्याचे ताजे वृत्त असताना अंदमान-निकोबार बेट शुक्रवारी दुपारी भूकंपाचा धक्का बसला. पोर्ट ब्लेअरमध्ये दुपारी पावणेतीनच्या सुमारास 5.1 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला आहे.सुदैवाने भूकंपात कुठलीही हानी झाल्याचं अद्याप वृत्त नाही.

दुसरीकडे, नेपाळमध्ये आलेल्या विध्वंसकारी भूकंपानंतर एव्हरेस्ट बेस शिबिरात अडकलेल्या 20 गिर्यारोहकांना वाचवण्यात चायनीज माउंटेनियरिंग असोसिएशनला यश आले आहे. सर्व गिर्यारोहक आंध्रप्रदेश आणि तेलंगण राज्यातील आहेत. भूकंपानंतर हिमस्खलन झाल्याने सर्व जण अडकून पडले होते.

नेपाळमध्ये कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे, अशी नेपाळच्या पाहणी दौर्‍यावर आलेले भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाळ यांची माहिती दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्देशानंतर अजित डोभाळ आणि परराष्ट्र सचिव एस.जयशंकर यांनी शुक्रवारी नेपाळमधील भूकंपग्रस्तांचा भागांचा आढावा घेतला. नेपाळमधील एकूणात स्थितीवर दोन्ही अधिकारी एक अहवाल तयार करून तो पंतप्रधान मोदी यांच्याकडे सुपुर्द करणार आहेत.

नेपाळमधील भूकंपात मृत भारतीयांची संख्या 19 वर पोहोचली आहे. त्याचप्रमाणे 33 विदेशी पर्यटकांचा मृत्यु झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यात 11 महिलांचा समावेश आहे. नेपाळच्या परराष्‍ट्र मंत्रालयाने सांगितले की, विदेशी पर्यटक मोठ्या संख्याने आले होते. त्यामुळे त्यांच्या मृताचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. नेपाळमध्ये आलेल्या भूकंपाने आतापर्यंत 6 हजारांहून जास्त नागरिकांचा बळी घेतला आहे. 14 हजार नागरिक जखमी झाले आहेत.