पर्यटन विकासातून रोजगार निर्मितीसाठी प्रयत्नशील- पालकमंत्री बडोले

0
13

महाराष्ट्र दिनाचा ५५ वा वर्धापन दिन
गोंदिया,दि.१ : नैसर्गीकदृष्ट्या संपन्न असलेल्या गोंदिया जिल्ह्यात अनेक पर्यटनस्थळे आहेत. या पर्यटनस्थळांचा विकास करुन जास्तीत जास्त पर्यटक जिल्ह्यात यावेत आणि त्यामाध्यमातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची ग्वाही पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.
आज १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमीत्त मुख्य शासकीय राष्ट्रध्वजारोहण पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयाच्या कारंजा मैदानावर करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर, नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे क्षेत्रसंचालक संजय ठवरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, अपर पोलीस अधीक्षक डॉ.संदिप पखाले, गोंदिया नगराध्यक्ष कशिश जायसवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री पुढे म्हणाले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन येथील वास्तव्याने पावन झालेल्या वास्तू खरेदीची प्रक्रीया लवकरच पूर्ण करण्यात येईल. मुंबई येथील इंदू मिलच्या जागेवर डॉ.आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याचा संकल्प आमच्या सरकारने केला आहे.
जिल्ह्यातील ९४ गावामध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत असल्याचे सांगून पालकमंत्री बडोले म्हणाले, हा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. एकात्मिक पद्धतीने शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाणी उपलब्ध करुन देण्यास या अभियानात प्राधान्य दिले आहे. उदभवणाऱ्या टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेने या अभियानात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
नवेगावबांध या पर्यटनस्थळाच्या ठिकाणी पर्यटक निवासाची कामे तसेच शेजारच्या परिसरात रस्ता बांधकामाची कामे हाती घेण्यात येतील असे सांगून पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, हाजराफॉल, प्रतापगड या पर्यटनस्थळाच्या विकासासाठी निधी संबंधित यंत्रणांना वितरीत करण्यात आला आहे. पर्यटन व तीर्थस्थळांची प्रचार-प्रसिद्धी करण्यासाठी जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील राज्य व राष्ट्रीय महामार्गावर ११ ठिकाणी सचित्र माहिती असलेले रेट्रो रिफ्लेक्टीव्ह बोर्ड तसेच पर्यटनस्थळांचे अंतर व मार्गांच्या माहितीसाठी सचित्र फलक लावण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पाची काही कामे पूर्ण झाली असून काही कामे प्रगतीपथावर असल्याचे सांगून पालकमंत्री बडोले म्हणाले, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील झाशीनगर उपसा सिंचन योजना अत्यंत उपयुक्त असून लवकरच शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी या योजनेचे काम वेगाने सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने जिल्ह्यातील १००० बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच कौशल्य विकास प्रशिक्षणातून ३०० ते ३५० बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगार उपलब्ध करुन देणार असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने जिल्ह्यातील ११८ रास्तभाव दुकाने महिला स्वयंसहाय्यता बचतगटांना देण्यात आले आहे. राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमात गोंदिया जिल्हा राज्यात अव्वल असून आरोग्य सेवा देण्यात आपला जिल्हा नागपूर मंडळात प्रथम असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.जिल्ह्यातील मासेमार बांधवांचे जीवनमान उंचवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करुन देण्यात जिल्ह्याची कामगिरी कौतुकास्पद असून मनुष्यदिवस निर्मीतीमध्ये गोंदिया जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. वनालगतच्या गावातील ७७२३ कुटुंबांना एलपीजी गॅस सिलेंडरचा पुरवठा करण्यात आल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
प्रारंभी पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. पालकमंत्री बडोले यांनी पोलीस, गृहरक्षक दल यांच्या परेडचे निरीक्षण केले. त्यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांचा सत्कार करण्यात आला.