नक्षलवादी म्होरक्‍याला कंठस्नान

0
10

वृत्तसंस्था
रायपूर : नक्षलग्रस्त छत्तीसगडमधील कोंडागाव जिल्ह्यात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका नक्षलवादी म्होरक्‍याला ठार करण्यात आले, तर दुसऱ्या नक्षलवाद्याला अटक करण्यात आली.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी घानोरा येथील जंगलात शोध मोहीम सुरू केली. पोलिसांना पाहताच नक्षलवाद्यांनी अंदाधुंद गोळीबाराला सुरुवात केली. त्याला पोलिसांनी चोख प्रत्त्युत्तर दिले, अशी माहिती कोंडागावचे पोलिस अधीक्षक अभिषेक मीना यांनी दिली. पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये सुमारे दोन तास गोळीबार सुरू होता. पोलिसांच्या चोख प्रत्युत्तरानंतर नक्षलवाद्यांनी जंगलात पलायन करण्यास सुरुवात केली. तेव्हा बद्रा दलमचा म्होरक्‍या फूलसिंग याला पोलिसांनी ठार केले, तर अंर्तगढ दलमचा म्होरक्‍या राकेश याला पळून जाताना पोलिसांनी अटक केली. फूलसिंगचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला. त्याच्याकडून दोन हॅंड ग्रेनेड, नक्षलवादी साहित्य, डायरी आणि औषधे आढळली. त्याच्या डायरीत नक्षलवादी कारवायांची माहिती आणि त्यांच्या आगामी योजनांची नोंद आहे. तसेच नक्षलवाद्यांच्या हिटलिस्टवरील व्यक्तींची नावेही असल्याचे मीना यांनी सांगितले. पलायन केलेल्या नक्षलवाद्यांना पकडण्यासाठी या माहितीचा उपयोग होणार आहे. पोलिसांनी जंगलामध्ये शोध मोहीम सुरू केली आहे.