३०० कोटींचा कंडोम घोटाळा ?

0
19

वृत्तसंस्था
नवी दिल्ली दि ६:: देशात विविध क्षेत्रांतील मोठ मोठे घोटाळे, गैरव्यवहार उघडकीस आलेले आहेत; पण आता एक वेगळाच घोटाळा समोर आला आहे. कुटुंबनियोजनासाठी व सुरक्षेच्या दृष्टीने उपयोगात येणा-या कंडोम खरेदीमध्येच तब्बल ३०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.
केंद्रीय मेडिकल सव्र्हिस सोसायटीकडून खरेदी करण्यात आलेल्या कंडोमबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मागील काही दिवसांमध्ये मेडिकल सव्र्हिस सोसायटीकडून ७५ कोटी कंडोम खरेदी करण्याचे टेंडर काढले होते, ३०० कोटी रुपये किंमतीचे हे टेंडर घेतलेल्या कंपनीने निकृष्ट दर्जाच्या कंडोमचा पुरवठा केला असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
केंद्रीय मेडिकल सव्र्हिस सोसायटीकडून खरेदी करण्यात आलेल्या कंडोमचे सरकारी दवाखान्यात वाटप करण्यात येते. त्यासाठी प्रत्येक वर्षी सरकारकडून कंडोमची खरेदी करण्यात येते. मोदी सरकारचे माजी आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी या खरेदीचे आदेश दिले होते त्यानंतर कंडोम खरेदीतील गैरव्यावहार समोर आला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या म्हणण्यानुसार केंद्रामध्ये भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर केंद्रीय मेडिकल सव्र्हिस सोसायटीकडून एक टेंडर काढण्यात आले होते. त्यामध्ये ३०० कोटी रुपयांच्या कंडोम सोबत औषधांची खरेदी करण्याचा प्रस्ताव होता. मात्र हे टेंडर घेणा-या कंपनीने नियमांना तिलांजली देत निकृष्ट दर्जाच्या कंडोमचा पुरवठा केला. कंडोमच्या दर्जाबाबत अधिका-यांना पूर्णपणे कल्पना असताना त्यांनी हा पुरवठा केला आहे.
सरकारचे नियम धाब्यावर
सरकारने सुरुवातीला गुणवत्ता टिकविण्यासाठी काही अटी घातल्या होत्या या अटींनुसार तीन वर्षांचा अनुभव असलेल्या फर्म टेंडरसाठी बोली लावू शकत होत्या; परंतु सीएमएसएसने या नियमांमध्ये बदल केला त्यामुळे नवीन कंपन्याही आता बोली लावू शकतात. नियम बदलताना कोणत्याही तांत्रिक समितीचा सल्ला घेण्यात आलेला नाही.