सिरोंचाचा पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळयात

0
25

नागपूर, दि ६: स्वस्त धान्य दुकानाराकडील साठा रजिस्टर नोंद नसल्याने त्याच्यावर कारवाई न करण्यासाठी १० हजारांची लाच मागणऱ्या सिरोंचा तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज अटक केली. अमित एकनाथ डोंगरे(३९) असे आरोपीचे नाव असून, त्याच्याकडे असरअली सर्कलची जबाबदारी होती.आज एसीबीच्या नागपूर परिक्षेत्राने विदर्भातील तब्बल चार ठिकाणी धाडी घालून सहा जणांना जाळयात अडकवले. नागपूर येथील धाडीत नागपूर सुधार प्रन्यासचा स्थापत्य अभियांत्रिकी सहायक चंद्रकांत नगरारे, वर्धा जिल्हयातील सिंधी रेल्वे येथील सहायक लाईनमन रामचंद्र कोपरकर व गडचिरोली जिल्हयातील सिरोंचा येथील अमित डोंगरे यांचा त्यात समावेश आहे. विशेष म्हणजे, भंडारा जिल्हयातील पवनी येथील भूमी अभिलेख कार्यालयावर धाड घालून तेथील तब्बल तीन कर्मचाऱ्यांना अटक केली. त्यात महेश हिंगे, तिर्थराज डोंगरे व जितेंद्र कांबळे यांचा समावेश आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, पुरवठा निरीक्षक अमित डोंगरे याने एका स्वस्त धान्य दुकानाला भेट दिली. मात्र दुकानातील साठा रजिस्टरवर साठयाची नोंद नव्हती. त्यामुळे दुकानदारावर कारवाई न करता जप्त केलेले रजिस्टर परत देण्यासाठी डोंगरे याने संबंधित दुकानदाराला १० हजारांची लाच मागितली. मात्र दुकानदाराची लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार एसीबीच्या अधिकाऱ्यांनी आज सापळा रचला आणि अमित डोंगरे याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करुन अटक केली. एसीबीचे पोलिस उपअधीक्षक रोशन यादव, पोलिस निरीक्षक दामदेव मंडलवार यांच्या नेतृत्वात हवालदार विठोबा साखरे, सतीश कत्तीवार, सुधाकर दंडिकवार, मिलिंद गेडाम, घनश्याम वडेट्टीवार आदींनी ही कारवाई केली.