रतलाममध्ये पाच अतिरेक्यांना अटक

0
10

वृत्तसंस्था
रतलाम,दि.7-पाकिस्तान-अफगाण सीमेवरील आपल्या म्होरक्यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपावर हल्ला करण्याचा कट आखणार्‍या इसिसशी संबंधित पाच अतिरेक्यांना मध्यप्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. रा. स्व. संघाचे नागपूर येथील मुख्यालयही अतिरेक्यांच्या हल्ल्याचे मुख्य लक्ष्य होते.
रा. स्व. संघ आणि भाजपासोबतच मध्यप्रदेशातील वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना ठार मारण्याची जबाबदारीही पाक-अफगाण सीमेवरील त्यांच्या म्होरक्यांनी दिली होती. इंडियन मुजाहिदीनतर्फे या अतिरेक्यांना आदेश देण्यात येत होते. त्यांच्यात सायबरवरून संवाद साधला जात होता. भाजपा आणि संघाच्या नेत्यांना ठार करा आणि नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण करा, असे आदेश या अतिरेक्यांना देण्यात आले होते, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने दिली.
इम्रान खान मोहम्मद शरीफ असे रतलाममधील या अतिरेक्यांचे नेतृत्व करणार्‍याचे नाव आहे. इंडियन मुजाहिदीनसाठी मध्यप्रदेशात अतिरेक्यांची भरती करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपविण्यात आली होती. हे पाचही जण इसिसचा सीरियातील नेता युसूफ अलहिंदीशी सायबरवरून संपर्कात होते. या पाचही अतिरेक्यांकडून दोन पिस्तुल आणि जिवंत काडतुसे ताब्यात घेण्यात आली असून, या अतिरेक्यांना बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षणही देण्यात आले असल्याचे चौकशीत उघड झाले आहे.
इम्रान खान हा २००३ ते २००८ या काळात पाच वेळा दुबईला गेला होता. याशिवाय, गेल्या वर्षी तो सौदी अरबलाही गेला होता. उत्तरप्रदेशच्या मुझफ्फरनगर येथील दंगलीनंतर २०१२ मध्ये त्याने अहल अल-सुफा या इस्लामिक गटात प्रवेश केला होता. पाक-अफगाण सीमेवरील म्होरक्यांनी गेल्या एक वर्षाच्या काळात या पाचही अतिरेक्यांच्या मनात संघ आणि भाजपाविषयी प्रचंड विष कालवले होते. यामुळेच ते संघ-भाजपा नेत्यांची हत्या करण्यास तयार झाले होते. युसूफ अलहिंदी या अतिरेक्याची यात महत्त्वाची भूमिका होती. २००८ मध्ये इंडियन मुजाहिदीनच्या मोड्युलचा पर्दाफाश झाल्यानंतर तो कराचीला पळाला होता. यानंतर इम्रान खानने आपला हा कट तडीस नेण्यासाठी मध्यप्रदेशातच आणखी काही लोकांचा शोध घेतला. यातून त्याने पाच अतिरेक्यांची निवड केली आणि त्यांच्यावर संघ-भाजपा नेत्यांची हत्या करण्यासोबतच नागपूर येथील संघ मुख्यालयावरही मोठा हल्ला करण्याची जबाबदारी सोपविली होती. त्याबाबतचा कट हे अतिरेकी तयार करीत असतानाच त्यांना बेड्या ठोकण्यात मध्यप्रदेश पोलिसांना यश आले.