शक्तिशाली भूकंपाचा उध्वस्त नेपाळला धक्का

0
11

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, दि. १२ – नेपाळमधील भूकंपाच्या कटू आठवणी ताज्या असतानाच मंगळवारी दुपारी नेपाळ व उत्तर भारत पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले आहे. नेपाळमधील कोडारी येथे भूकंपाचा केंद्रबिंदू असून या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.४ एवढी होती. 25 एप्रिलला नेपाळमध्ये 7.9 तीव्रतेचा भुकंप आला होता. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर विनाशाला सामोरे जावे लागले होते. पाकिस्तान आणि बांगलादेशातही या भुकंपाचे धक्के जाणवले आहेत.
नेपाळबरोबरच राजधानी दिल्ली, हिमाचल प्रदेश, सिक्कीम, आसाम, बिहार, झारखंड, पश्‍चिम बंगाल या राज्यांसहित संपूर्ण उत्तर भारतासही या भूकंपाचा धक्का जाणवला. नागपूरच्या काही भागांमध्येही या भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपामुळे नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी इमारतींबाहेर पळून मोकळ्या ठिकाणी आश्रय घेतला. दिल्लीमध्येही या भूकंपामुळे इमारती काही क्षणांसाठी हलल्याचे जाणविल्याचे सूत्रांनी सांगितले.
नेपाळमधील कोडारी येथे भूगर्भामध्ये 19 किमी अंतरावर या भूकंपाचे केंद्रस्थान होते. एव्हरेस्ट शिखराच्या बेसकॅंपपासून जवळच असलेले हे ठिकाण काठमांडूच्या पूर्वेस सुमारे 52 किमी अंतरावर आहे.