नाशिकमध्ये अपघात, पत्रकार प्रियंका डहाळे यांचा मृत्यू

0
12

नाशिक, दि. १२ – नाशिकमधील पाथर्डी फाट्याजवळ ट्रक व कुल कॅबच्या अपघातात तिघा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. मृतांमध्ये पत्रकार प्रियंका डहाळे यांचाही समावेश असून त्या स्वतःच्या साखरपुड्यासाठी नाशिकमधील मुळगावी जात होत्या.

दिव्यमराठी या वृत्तपत्रात सांस्कृतीक व सिनेपत्रकार म्हणून काम करणा-या प्रियंका डहाळे (३०) यांचा १४ मेरोजी साखरपुडा होणार होता. साखरपुड्याची खरेदी आटपून प्रियंका सोमवारी रात्री कुल कॅबने नाशिकमधील मूळगावी जाण्यासाठी निघाल्या होत्या. पाथर्डी फाट्याजवळ पोहोचण्यापूर्वी प्रियंका यांचे त्यांच्या वडिलांशी फोनवर बोलणेही झाले होते व ते प्रियंकाला घेण्यासाठी येणार होते. मात्र पाथर्डी फाट्याजवळ वाळूचा ट्रक व कुल कॅबमध्ये विचित्र अपघातात झाला. या अपघातात कुल कॅबचा चालक, आणखी एक प्रवासी व प्रियंका डहाळे अशा तिघा जणांचा मृत्यू झाला. प्रियंका डहाळे यांचा एक कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे.
नवोदितांच्या पहिल्या काव्यसंग्रहासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे दिला जाणारा तृतीय क्रमांकाचा विशाखा काव्य पुरस्कार त्यांना प्राप्त झाला होता. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून मास कम्युनिकेशनची पदवी घेतली हाेती. सुरुवातीच्या काळात त्यांनी “लोकसत्ता’साठी मुक्त पत्रकार म्हणून काम केले होते. त्यानंतर त्या ‘दिव्य मराठी’त रुजू झाल्या होत्या. त्यांच्या पश्चात आजी, आई, वडील, बहीण, भाऊ असा परिवार आहे.