दोन दिवस अगोदरच मॉन्सून अंदमानात

0
12

पुणे दि. 16 : देशभरातील शेतकऱ्यांच्या नजरा लागून असलेले नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) शनिवारी (ता. 16) अंदमान बेटांवर दाखल झाले आहे. हवामान विभागाने यंदा सोमवारी (ता. 18) दाखल होणार असा अंदाज व्यक्त केला होता, मात्र मॉन्सून दोन दिवस अगोदरच अंदमानात दाखल झाला आहे. शनिवारी मॉन्सूनने संपूर्ण निकोबार बेटे आणि उत्तर अंदमानच्या काही भागापर्यंत मजल मारली आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवर बहुतांशी ठिकाणी पावसाने जोर धरला आहे.

साधारणतः 20 मे रोजी मॉन्सून अंदमानात दाखल होत असतो. यंदा मात्र चार दिवस अगोदर दाखल झाला आहे. शनिवारी संपूर्ण दक्षिण अंदमान, निकोबार बेटसमूह व्यापला असून, अग्नेय बंगालचा उपसागर, उत्तर अंदमान समुद्र आणि अंदमान बेटांपर्यंत मॉन्सूनचे वारे दाखल झाले आहेत. मॉन्सूनच्या पुढील प्रगतीसाठी अनुकूल स्थिती असून, सोमवारपर्यंत (ता. 18) मॉन्सून दक्षिण बंगालच्या उपसागर, पूर्व-मध्य बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र आणि बेटांचा उर्वरित भाग व्यापण्याची शक्‍यता असल्याचे हवामान विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.