शेतकरी जनता अपघात विमा योजना

0
14

शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, वीजेचा शॉक लागणे, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, वाहन अपघात आदी कारणास्तव शेतकऱ्‍यांचा मृत्यू होतो किंवा अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्न बंद होते. अशा अपघातग्रस्त शेतकऱ्‍यास/त्याच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता शेतकरी जनता अपघात विमा योजनेचा लाभ देण्यात येतो.

विमा योजनेसाठी पात्रतेचे निकष व आर्थिक लाभाचे स्वरुप
महाराष्ट्र राज्यातील 10 ते 75 वयोगटातील महसूल नोंदीनुसार असलेला खातेदार शेतकरी. शेतकरी म्हणून त्याचे नावाचा समावेश असलेला 7/12 किंवा 8-अ नमुन्यातील उतारा. ज्या नोंदीवरुन अपघातग्रस्त शेतकऱ्‍याचे गाव 7/12 वर आले असेल अशी संबंधित फेरफार नोंद (गाव नमुना नंबर 6-ड). शेतकऱ्‍याच्या वयाच्या पडताळणीसाठी शाळा सोडल्याचा दाखला/रेशन कार्ड/निवडणूक कार्ड/शाळेच्या मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र/ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र. शेतकऱ्‍यांचे वारस म्हणून गाव कामगार तलाठ्याकडील गाव नमुना नंबर 6-क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद.

या विमा योजनेद्वारे अपघातामध्ये मृत्यू झाल्यास एक लाख रुपये, अपघातामध्ये दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी झाल्यास एक लाख रुपये, एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास एक लाख रुपये, एक डोळा अथवा एक अवयव निकामी झाल्यास 50 हजार रुपये नुकसान भरपाई दिली जाते.

सदरचे आर्थिक लाभ पुढील प्राधान्यक्रमांकानुसार दिले जाते. मृत शेतकऱ्‍याची पत्नी/मृत शेतकरी स्त्रीचा पती, मृत शेतकऱ्‍याची अविवाहित मुलगी, मृत शेतकऱ्‍याची आई, मृत शेतकऱ्‍याचे मुले, मृत शेतकऱ्‍यांची नातवंडे, मृत शेतकऱ्‍याची विवाहित मुलगी.

या विमा संरक्षणामध्ये पुढील बाबींचा समावेश नाही –
विमा कालावधीचे पूर्वीचे अंपगत्व, आत्महत्येचा प्रयत्न, आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वत:ला जखमी करुन घेणे, गुन्ह्याच्या उद्देशाचे कायद्याचे उल्लंघन करतांना झालेला अपघात, अंमली पदार्थाच्या अंमलाखाली असतांना झालेला अपघात, नैसर्गिक मृत्यू, भूमिस्खलन, बाळंतपणातील मृत्यू, शरीरांतर्गत रक्तस्त्राव, मोटार शर्यतीतला अपघात, युद्ध, सैन्यातील नोकरी, जवळच्या लाभ धारकाकडून झालेला खून.