पाच वर्षांत चोवीस तास वीज-केंद्रीय ऊर्जामंत्री गोयल यांची ग्वाही

0
8

वृत्तसंस्था
नवी दिल्ली,दि. १८-आगामी पाच वर्षात देशातील प्रत्येक घरात चोवीस तास वीज उपलब्ध झालेली असेल, अशी ग्वाही केंद्रीय ऊर्जा आणि कोळसा मंत्री पीयूष गोयल यांनी आज सोमवारी दिली.
केंद्रातील भाजपाप्रणीत रालोआ सरकारचे एक वर्ष ऐतिहासिक आणि देशवासीयांच्या अपेक्षांची पूर्तता करणारे ठरले आहे. या एका वर्षात आम्ही बरीच महत्त्वाची कामे केली आणि आजवरच्या सरकारांच्या कामांचे विक्रमही मोडीत काढले. विजेच्या बाबतीत देशाला स्वावलंबी करण्याच्या दिशेने सरकारने अनेक ठोस उपाय केले आहेत. याचे परिणाम लवकरच दिसून येतील. पाच वर्षांतच देशातील प्रत्येक घरांमध्ये विजेचा निरंतर पुरवठा सुरू झालेला असेल, असे गोयल यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले. रालोआ सरकारला याच महिन्यात एक वर्ष पूर्ण होत असल्याने त्यांची ही मुलाखत घेण्यात आली होती.
आगामी सहा ते आठ महिन्यात सर्दर्न ट्रान्समिशन कॉरिडोरमध्ये २६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. या प्रकल्पाकरिता एक लाख कोटी रुपयांपर्यंतची बोली लागू शकते. यामुळे देशभरातील पायाभूत सुविधा मजबूत आणि अद्ययावत होणार आहेत, असे सांगताना पीयूष गोयल म्हणाले की, ऊर्जा नूतनीकरण क्षेत्रातही अनेक महत्त्वाचे प्रकल्प हाती घेण्यात आले असून, त्यावर वेगाने काम सुरू झाले आहे. सौर ऊर्जेच्या माध्यमातून एक लाख मेगावॅट आणि पवन ऊर्जेतून ३८ हजार मेगावॅट इतके विजेचे उत्पादन घेण्याचा आमचा मानस आहे.