यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज

0
12

वृत्तसंस्था
नवी दिल्ली दि.२- देशात 2015 या वर्षात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा भीतीदायक अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने आज (मंगळवार) वर्तविला. यंदा सरासरीच्या 88 टक्के इतकाच पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज असल्याचे विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिल्लीत सांगितले. यापूर्वी सरासरीच्या 93 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता.

नैर्ऋत्य मोसमी पावसावर विपरीत परिणाम करणाऱ्या अल्‌ निनोच्या प्रभावामुळे यंदा पाऊस 96 टक्‍क्‍यांचीही सरासरी गाठू शकणार नाही. अवकाळी पाऊस आणि गारपिटीने आधीच हवालदिल झालेल्या बळिराजासाठी मॉन्सूनचा ताजा अंदाज “दुष्काळात तेरावा महिना‘ असा ठरला आहे. भारतात सलग दुसऱ्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार आहे. गतवर्षी देशात 95 टक्के म्हणजे सरासरीच्या 11.9 टक्के कमी पर्जन्यवृष्टी झाली होती. आता यामध्ये आणखी घट झाली आहे.

केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनी यापूर्वी मोसमी पावसाबाबत अंदाज वर्तविताना त्याची सरासरी 93 टक्के राहिल असे म्हटले होते. पण, आज नव्याने सादर केलेल्या आकडेवारीत सरासरी 88 टक्के राहिल, असे सांगण्यात आले आहे.