भारतीय लष्कराची म्यानमारमध्ये कारवाई

0
11

वृत्तसंस्था
नवी दिल्ली दि. ९ -केवळ इस्रायल वा अमेरिकाच नव्हे तर वेळ पडल्यास विदेशी भूमीत धडक मारून अतिरेक्यांना ठार करण्याची आपलीही क्षमता आहे, हे आज भारतीय लष्कराने एका जबरदस्त कारवाईतून संपूर्ण जगाला दाखवून दिले. मणिपूरच्या चंडेल जिल्ह्यात अलीकडेच बंडखोरांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात लष्कराच्या डोग्रा बटालियनचे २० जवान शहीद झाल्यानंतर, भारतीय लष्कराने थेट म्यानमारमध्ये घुसून आपल्या जवानांच्या हत्येचा बदला घेत १५ अतिरेक्यांचा खात्मा केला. या धडक मोहिमेत म्यानमारच्या सैनिकांनी भारतीय लष्कराला विशेष मदत केली.
लष्करी मोहिमेचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल रणबीर सिंग यांनी आज मंगळवारी पत्रपरिषदेत बोलताना या मोहिमेची माहिती दिली. भारतीय लष्कराने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून अतिरेक्यांविरोधात धडक कारवाई केली. हे अतिरेकी म्यानमारमधूनच आले होते आणि भारतीय जवानांवर आणखी मोठे हल्ले करण्याची त्यांची योजना होती. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर आम्ही ही कारवाई केली असल्याचे रणबीर सिंग यांनी सांगितले.
मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यात बंडखोरांनी गेल्या आठवड्यात केलेल्या हल्यात २० जवान शहीद आणि अन्य १५ जवान जखमी झाले होते. ईशान्य भारतातील गेल्या काही दशकांमधील हा सर्वात भीषण दहशतवादी हल्ला होता.
दरम्यान, गुप्तचर संस्थांच्या मते, आज मंगळवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. भारत व म्यानमारमधील आंतरराष्ट्रीय सीमारेषा आणि नागालॅण्ड व मणिपूर राज्यातील सीमारेषा यादरम्यान दोन दहशतवादी गटांना लक्ष्य करण्यात आले. या कारवाईमध्ये १५ दहशतवादी ठार झाले. सोबतच, या भागातील भारतीय नागरिकांना व लष्कराला असलेला धोका टाळण्यातही यश आले. भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण करणार्‍या कुणाचीही मुळीच गय केली जाणार नाही. त्यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर देण्यात येईल, असेही मेजर जनरल रणबीर सिंग यांनी स्पष्ट केले.
भारत व म्यानमारमधील लष्करात सहकार्याचा बराच जुना इतिहास असून, भविष्यातही अशा स्वरूपाच्या दहशतवादाचा सामना करण्यासाठी म्यानमारच्या सहकार्याची अपेक्षा असल्याचे भारतातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.