४ नक्षल्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण

0
9

गडचिरोली,दि.२७: सुमारे १० लाखांचे बक्षीस असलेल्या चार जहाल नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केल्याची माहिती पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
संदीप पाटील यांनी सांगितले की, राज्य शासनाच्या आत्मसमर्पण योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. एटापल्ली तालुक्यातील कोटमी येथे अलीकडेच निर्माण झालेल्या पोलिस मदत केंद्राने चांगली कामगिरी केली असून, तेथील पोलिसांच्या प्रयत्नाने आतापर्यंत सहा नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले आहे. आज आत्मसमर्पण केलेल्यांमध्ये विशाल उर्फ मुंशी येशू पोटावी, रा.आसावंडी, ता.एटापल्ली,प्रभाकर उर्फ लालू उर्फ रामदास गोटा रा.आसावंडी, ता.एटापल्ली, किशोर उर्फ पुनाजी छत्रू कुमोटी रा.पुसेर, ता.चामोर्शी व सुधाकर दानू आतला रा. पडयानटोला, ता.एटापल्ली यांचा समावेश आहे. विशाल पोटावी हा २००६ मध्ये मिलिशियामध्ये सहभागी झाला. त्यानंतर तो कसनसूर दलमचा सदस्य झाला. कोटमी येथील जाळपोळ व तेथील शाळेत काळा झेंडा फडविण्यात त्याचा सहभाग होता. प्रभाकर गोटा २००४ पासून नक्षल चळवळीत सहभागी असून, तो नईबेरड दलमचा सदस्य होता. २००७ मध्ये बिनागुंडा येथे झालेल्या चकमकीत तो सहभागी होता. किशोर कुमोटी हा २०१२ पासून चातगाव दलमचा सदस्य असून, गोडलवाही ग्रामपंचायत जाळपोळ, काकडयेली, मरकेगाव, डोकीनटोला येथे वेगवेगळया वेळी झालेल्या चकमकी, राजेश कुवारी खून इत्यादी प्रकरणांमध्ये त्याचा सहभाग होता. सुधाकर दानू आतला हा २०१२ पासून कसनसूर दलममध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत होता.
याच महिन्यात चातगाव दलम कमांडर विजय उर्फ धनिराम केसरी दुगा(२६) याने पत्नी राधा उर्फ बसंती मनिराम कोवा(२३) हिच्यासह पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले होते. त्यामुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसल्याचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील म्हणाले.