पावसाळा सुरू होऊनही रस्ते दुरूस्ती प्रलंबितच

0
12

गोंदिया दि २7:घाटकुरोडा ते घोगरा व घोगरा ते मुंडीकोटा या उखडलेल्या रस्त्यांची दुरूस्ती पावसाळा सुरू होवूनही करण्यात आली नाही. त्यामुळे पादचाऱ्यांसह वाहन चालकांना ये-जा करण्यासाठी मोठाच त्रास होत आहे.घाटकुरोडा ते घोगरा रस्त्याच्या मधोमध मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना व दुचाकी चालकांना ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कधी-कधी रस्त्यावरचे खड्डे चुकविण्याच्या नादात गाडीचे संतुलन बिघवून मोठा अपघात होण्याची शक्यता असते.
घाटकुरोडा गाव वैनगंगा नदीच्या काठावर असून येथील रेती घाट सुरूच आहे. दररोज रेती भरून ओव्हरलोड ट्रक घोगरा रस्त्याने नागपूरकडे जातात. या रेतीच्या ट्रक धारकांना वेळेचे बंधन नाही. रात्री-बेरात्री ट्रक जात असतात. रस्त्याच्या कडेला ज्या व्यक्तींची घरे आहेत, त्यांची तर झोपच उडाली आहे. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी असून रस्ता जीर्ण झाला आहे. त्यामुळे सदर मार्ग अपघाताला आमंत्रण ठरत आहे.
घोगरा ते मुंडीकोटा रस्ता संपूर्ण जीर्ण झाला आहे. ठिकठिकाणी मोठाले खड्डे पडले आहेत. पाच वर्षांपूर्वी सदर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. पण आता डांबर कुठे गेला याचा पत्ताच नाही. मुंडीकोटा हे केंद्राचे ठिकाण असून येथे छोटी व्यापारपेठ आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, बँक, रेल्वे स्थानक असून आठवडी बाजारही भरतो. अनेक गावातील लोकांचे येथे नेहमीच येणे-जाणे असते.
या रस्त्यांनी शेतकरी, विद्यार्थी, प्रवासी नेहमीच ये-जा करतात. तसेच रस्त्याच्या कडेला तीन राईस मिल आहेत. त्यामुळे ट्रकची नेहमीच वर्दळ असते. सदर रस्ता पूर्णत: जीर्ण झाला असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत आहे. त्यामुळे वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज कळत नाही व अपघाताची शक्यता ओढवते.तरी बांधकाम विभागाने याची तत्काल दखल घेवून रस्ता दुरूस्ती करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.