शेतक-यांना कर्जमाफी नाही – फडणवीस

0
8

मुंबई, दि. १२ – शेतक-यांना पूर्ण कर्जमाफी देणे हा कायमस्वरुपी तोडगा नसून शेतकरी सक्षम कसा होईल यावर भर देणे गरजेचे आहे असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले आहे. २००८ मध्ये आघाडी सरकारच्या काळात झालेल्या कर्जमाफीत शेतक-यांचा काहीच फायदा झाला नाही, याऊलट बँकांना फायदा झाला असा दावाही त्यांनी केला आहे.
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. शेतक-यांना कर्जमाफी देण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. या मागणीवर फडणवीस म्हणाले, कर्जमाफी देणे हा पर्याय असला तरी त्यातून शेतक-यांचा फायदा नाही, आघाडी सरकारच्या काळात झालेल्या कर्जमाफीत काँग्रेस व राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या बँकांचा नफा झाला व बँकांमधील घोटाळे झाकले गेले. अगोदरच्या कर्जमाफीत बँकेना दिलेल्या निधीपैकी २५ टक्के रक्कम शेतीत गुंतवली असती तर शेतक-यांना फायदा झाला असता. शेतक-यांना विविध साहित्यखरेदीसाठी अनुदान, कृषी पंप देणे अशा योजनांवर पैसे खर्च केले असते तर राज्यातील शेतक-यांची क्रयशक्ती वाढली असती असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आमचे सरकार शेतक-यांना सक्षम करण्यावर भर देईल अशी ग्वाही त्यांनी दिली. शेतक-यांच्या कर्जफेडीची पुनर्रचना केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात ९० लाख हेक्टर जागेवर पेरणी झाली असून पावसात खंड पडल्याने सुमारे २३ लाख हेक्टरवरील पेरणी अडचणीत आली आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, पश्चिम विदर्भ व मराठवाडा वगळता राज्याच्या अन्य भागात आठवडा भरात पाऊस पडेल अशी आशाही त्यांनी वर्तवली. राज्यात ज्या ठिकाणी पाऊस नसेल तिथे १ ऑगस्टपासून कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय घेतल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. सरकारमधील मंत्र्यांवर झालेल्या भ्रष्टाचा-याच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आम्ही आमची बाजू मांडली आहे, आम्ही भ्रष्टाचार केलेला नाही, मात्र तरीदेखील आम्ही सर्व प्रकारच्या चौकशींसाठी तयारी आहोत. सत्ताधारी बाकांवरील मित्रपक्षांमध्ये कुरबुर सुरु आहे. मात्र फडणवीस यांनी हे आरोप फेटाळून लावले. शिवसेना व भाजपात कोणतेही मतभेद नाही, हम साथ साथ है अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.