जलदगती न्यायालयात प्रकरण चालवा: रखरखत्या उन्हात निघाला मोर्चा

0
23

गोंदिया : शहरातील सूर्याटोला येथे माहेरी आलेली पत्नी, मुलगा आणि सासऱ्यावर पेट्रोल टाकून आरोपीने जाळले. यातील तिघांचाही मृत्यू झाला. या घटनेने समाजमन हळहळले. अशा घटनांची पुनरावृत्ती होवू नये. आधीच तक्रार देवूनही हलगर्जी करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी. जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून आरोपीविरोधात कठोर कारवाईच्या मागणीला घेवून आज सामाजिक संघटनांच्या वतीने सूर्याटोला येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री, महिला व बालकल्याणमंत्री यांच्या नावे निवेदन देण्यात आले.
सूर्याटोला येथील आरती शेंडे हिचे लग्न तिरोडा तालुक्यातील भिवापूर येथील किशोर शेंडे याच्याशी झाले होते. मात्र ते नेहमी तिच्याशी भांडण करत होता. त्यामुळे पत्नी आरती आपल्या मुलासह सूर्याटोला येथे वडील देवानंद मेश्राम यांच्याकडे आली होती. १५ फेब्रुवारीच्या रात्री आरोपी किशोर शेंडे याने पत्नी, सासरा देवानंद शेंडे आणि मुलगा जय शेंडे याच्यावर पेट्रोल टाकून आग लावली. यात तिघांचाही मृत्यू झाला. या घटनेतील आरोपीला अटक झाली. मात्र आरतीने आपल्या पतीविरोधात यापूर्वी तिरोडा पोलिसांत तक्रार केली होती. परंतु, त्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे दिरंगाई करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. जळीत कांडातील आरोपीला कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टीने न्यायालयीन कारवाईकरिता ज्येष्ठ विधिज्ञाची नेमणूक करण्यात यावी. आरोपीला कुठल्याही परिस्थितीत जामीन देण्यात येवू नये. खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येक मृत व्यक्तीचा मोबदला म्हणून २५ लाख रुपये देण्यात यावे.पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावांमध्ये पोलिसांनी तेथील नागरिकांना कौटुंबिक हिंसाचार कायद्याबाबत मार्गदर्शन करून पोलीस यंत्रणा त्यांच्या पाठिशी असल्याचा विश्वास द्यावा, या मागण्यांसाठी आज सामाजिक संघटनांच्या वतीने सूर्याटोला येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री आणि महिला व बालविकासमंत्री यांच्यानावे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी प्रामुख्याने दद्दा बहेकार, सविता बेदरकर, सुनील बाबरे, किशोर केवट, हितेश बागडे, रणजीत कांबळे, किशन अजीत, ममता मेश्राम, इंदुबाई चाचेरे, अंजू बागडे, नितेश बागडे, जीतेंद्र चौधरी, सचीन कटरे, सविता अंबाडारे, भारती चाचेरे, राधेशाम चौधरी, राजेश गिरघुसे, ओमकार मानकर, कामना बागडे, गुड्डु रहांगडाले, राकेश मानकर आदींची उपस्थिती होती.