जिल्ह्यात ५ ऑक्टोबर पासून हॉटेल्स, बार सुरु होणार

• लॉकडाऊनची सुधारित नियमावली लागू ; • शाळा, महाविद्याले बंद राहणार

0
467

गोंदिया, दि. ०१ (जिमाका) : राज्य शासनाने लॉकडाऊनचा कालावधी ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत वाढविला आहे. तसेच काही बाबींना लॉकडाऊनमधून शिथिलता देण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातही लॉकडाऊनचा कालावधीत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवून याविषयीचे सुधारित आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी जारी केले आहेत. लॉकडाऊनच्या सुधारित आदेशानुसार जिल्ह्यात ५ ऑक्टोबर २०२० पासून हॉटेल्स, फूड कोर्ट, रेस्टॉरंट, बार हे ५० टक्के क्षमतेसह सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

हॉटेल्स, फूड कोर्ट, रेस्टॉरंट, बार चालविण्यासाठी स्वतंत्र ‘एसओपी’ पर्यटन विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्याप्रमाणे निर्देशांचे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक राहणार आहे. जिल्ह्यातील यापूर्वी परवानगी दिलेली सर्व आवश्यक आस्थापना, दुकाने पूर्वीप्रमाणेच सुरु राहतील. कोणत्याही विशिष्ट, सामान्य आदेशाद्वारे परवानगी दिलेले उपक्रम सुरु ठेवण्यास परवानगी राहील. याव्यतिरिक्त इतर महत्वाच्या बाबींच्या परवानगीसाठी स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येतील. ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर राज्यांतर्गत व आंतरराज्यीय वाहतुकीवर कुठलेही निर्बंध राहणार नाही.

जिल्ह्यात शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक व कोचिंग संस्था इत्यादी ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत बंद राहतील. ऑनलाईन व दूरस्थ शिक्षणाची परवानगी कायम राहील व त्यास प्रोत्साहित केले जाईल. सिनेमा हॉल, जलतरण केंद्र, मनोरंजन पार्क, चित्रपटगृहे (मॉल्स व मार्केट कॉम्प्लेक्सेसमधील), ऑडोटोरीयम, सभागृह इत्यादी सारखी सर्व ठिकाणे बंद राहतील. गृह मंत्रालयाच्या परवानगीशिवाय आंतरराष्ट्रीय प्रवासास बंदी राहील. सामाजिक, राजकीय, खेळ विषयक, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमास व मोठ्या प्रमाणातील कार्यक्रमास बंदी राहील. जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. केंद्र शासन व राज्य शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या निर्देशान्वये प्रतिबंधित क्षेत्रातील सीमांकन व कार्यवाही पुढील आदेशापर्यंत लागू राहील, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी श्री. मीना यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद केले आहे.
*****