‘विदर्भ कनेक्ट’ची दिल्लीत हाक : स्वतंत्र विदर्भासाठी सार्वमत घ्या

0
11

नवी दिल्ली दि. ११: केंद्र आणि महाराष्ट्रातही भारतीय जनता पार्टीचे सरकार असल्याने उशिरा का होईना स्वतंत्र विदर्भाच्या मागणीने पुन्हा जोर धरला आहे. विशेष म्हणजे बहुदा प्रथमच केंद्र सरकारला स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी सार्वमत घेण्यासंदर्भात निवेदन दिले जाणार असून, यासाठी ‘विदर्भ कनेक्ट’ या संघटनेचे पदाधिकारी दिल्लीत डेरेदाखल झाले आहेत.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अँड. श्रीहरी अणे यांनी सांगितले की, विदर्भाने महाराष्ट्रासोबत जाऊन आपल्या पायावर धोंडा मारून घेतला आहे. राज्याच्या विकासात विदर्भाची स्थिती काय झाली आहे, हे पाच दशकांचा इतिहासच सांगतो. आज विदर्भ ‘आत्महत्यांचा प्रदेश’ म्हणून ओळखला जात आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘स्वतंत्र विदर्भ राज्य हवे की नाही’ यासाठी नागपूर, अमरावती, चंद्रपूर आणि यवतमाळात सार्वमत घेण्यात आले होते.
लाखो लोक मतदानात सहभागी झाले. एकट्या नागपूर शहरात सहा लाख लोकांनी मतदान केले होते. या चार शहरांमधील ९१ ते ९६ टक्के लोकांनी स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. भाजपाने तर निवडणुकाही जवळपास याच मुद्यावर लढविल्या होत्या. परंतु पक्षाच्या नेत्यांनी यादिशेने पुढे काही पाऊल उचलले नाही, अशी खंत अणे यांनी व्यक्त केली.
हिंसक आंदोलनच हवे का?
मागील चार ते पाच दशकांपासून स्वतंत्र विदर्भाची मागणी करण्यात येत असताना या मागणीत पाहिजे तसा प्रभाव दिसत नसल्याचे दिल्लीतील नेत्यांचे म्हणणे आहे. सरकारच्या दृष्टीने आत्मदहन, बेमुदत उपोषण अथवा हिंसक आंदोलन झाले तरच मागणी बळकट होत असल्यास हे सुद्धा होईल,असा इशारा अँड. अणे यांनी दिला.दरम्यान, मंगळवारी दिल्लीत भाजपा नेते पी.ए. संगमा यांच्या पुढाकाराने लहान राज्यांच्या मागणीला बळ आणि तिसरा राज्य पुनस्र्थापना आयोग स्थापन करण्याच्या मागणीसाठी एक परिषद आयोजित करण्यात आली आहे. विदर्भाच्या प्रतिनिधींनाही या परिषदेचे आमंत्रण आहे.