तिरोडा तालुक्यात अवैध रेतीसाठा जप्त

0
16

तिरोडा दि. १४: राज्यात महसूल विभागाकडून विशेष मोहिम राबविली जात आहे. रेतीमाफियांनी जागोजागी अवैधरित्या रेतीचा मोठा साठा जमा केला आहे. त्यावर शासनाने कारवाईचे आदेश दिले असून हा साठा जप्ती मोहिम सुरु झाली आहे.

तिरोडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात नदीघाट लिलाव झाले आहे. यामधून मोठ्या प्रमाणात अवैध रेती वाहतूक केली जात आहे. या तालुक्यात अदानीसारखा विद्युत प्रकल्प आल्यामुळे बांधकामे वाढली आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रेतीचा वापर होत आहे. येथून नागपूर शहरात सुद्धा मोठ्या प्रमाणात रेती वाहतुक केली जाते. याकरिता रेती माफियांनी जागोजागी रेतीचा मोठा साठी जमा केला आहे.

या बाबीला लक्षात घेताच तिरोडाचे उपविभागीय अधिकारी प्रविण महिरे यांनी दि. ११ आॅगस्टला कवलेवाडा, अर्जुनी मधील १२०० ब्रॉस रेती साठा जप्त केला. त्याची अंदाजे किंमत १८ लक्ष रुपये असूून पुढील कार्यवाही करण्याचे आदेश तालुका प्रशासनाला दिले आहे.

तालुक्यात अजून काही ठिकाणी रेतीचे मोठे साठे जमा असून त्यावर सुद्धा कार्यवाही होवून फौजदारी गुन्हे दाखल होणार काय? असा प्रश्न जनसामान्यात उपस्थित होत आहे. तालुक्यातील कवलेवाडा येथे ५०० ब्रॉस, अर्जुनी येथे दोन ठिकाणी ७०० ब्रॉस असा एकूण १२०० ब्रॉस रेती साठी प्रशासनाने जप्त केला आहे. पुढील कार्यवाहीचे आदेश देण्यात आले आहे. माफियांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी आहे.