पांढरी ग्रामपंचायतला ठोकले कुलूप

0
14

सडक अर्जुनी ,दि.१७ – : हिशोब न सादर न केल्यामुळे संतप्त झालेल्या गावकर्‍यांनी ग्राम विकास अधिकार्‍यांच्या भोंगळ कारभाराचा विरोध करीत ग्राम पंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले. स्वातंत्र दिनी आयोजित ग्रामसभेत हा प्रकार घडला असून ग्रामविकास अधिकार्‍यांना हटविण्याची मागणी गावकर्‍यांनी केली आहे.
प्रत्येक गावात १५ ऑगस्ट रोजी आमसभेचे आयोजन केले जात असून त्यामध्ये नवीन कामांची रुपरेखा आखली जाऊन तंटामुक्त समितीसह अन्य समित्यांची निवड केली जाते. त्यानुसार येथील सभा सुरू असताना गावकर्‍यांनी येथील ग्रामविकास अधिकारी एम.एस. रामटेके यांना मे महिन्याची ग्रामसभा न झाल्यामुळे मागील हिशेब मागितला.परंतु रामटेके यांनी हिशेब न दिल्यामुळे ग्रामवासीयांनी कुठे तरी भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त करून त्यांना सर्व दस्तावेज सादर करण्यास सांगितले. परंतु त्यांनी दस्तावेज सादर न केल्याने गावकर्‍यांनी सरपंच अनिल मेंढे व संपर्क अधिकारी एन.जे. रहांगडाले यांच्या समोर ग्रामसभेची प्रोसिडींग लिहून घेतली. तसेच समस्त गावकरी व पोलीस पाटील उत्तम कोटांगले, यादोराव मदनकर यांच्या समक्ष सरपंच व ग्रामविकास अधिकार्‍यांच्या खोलीला कुलूप ठोकले.
ग्रामविकास अधिकारी रामटेके यांच्याकडे डुंडा व पांढरी ग्रामपंचायतचा कारभार असून ठरलेल्या दिवशी ग्रा.पं. कार्यालयात ते हजर राहत नाही.त्यामुळे जनतेला दाखल्याकरिता भटकंती करावी लागते. ग्रामसभेत झालेला ठराव पंचायत समितीला पाठवित नसल्याने गावामध्ये विकासाची कामे होत नाही. झालेल्या कामाचे बिल कंत्राटदाराला देत असून कॅशबुकवर लिहले जात नाही. असा भोंगळ कारभार सुरू असून त्यांची तक्रार खंडविकास अधिकारी रामदास धांडे यांना दिली असता तेही रामटेके यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयात तक्रार दिली. मात्र त्यांनी सुध्दा कसलीही कारवाई न केल्याचे बोलले जात आहे.
विशेष म्हणजे आठ दिवसापूर्वी पांढरी व डुंडा ग्रामपंचायतचे ऑडीट झाले असून संबंधित अधिकार्‍यांनी ऑडीट कशाप्रकारे केले याची चौकशी व्हावी, मागील पाच वर्षांचा हिशेब देण्यात यावा तसेच रामटेके यांना पांढरी व डुंडा ग्राम पंचायत मधून काढण्याची कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा खंडविकास अधिकारी यांच्या समक्ष करण्यात यावी, ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर ग्रामविकास अधिकार्‍यांनी द्यावे. अशा प्रकारे सदर आमसभेची प्रोसिडींग ग्रामविकास अधिकार्‍यांकडून लिहून घेऊन त्यांच्या खोलीला गावकरी, तंटामुक्त अध्यक्ष, पोलीस पाटील व ग्रामपंचायतचे अधिकारी यांच्या समक्ष कुलूप लावण्यात आले. रामटेके यांची तक्रार वरिष्ठ अधिकार्‍यांना देण्यात येणार आहे तरी चौकशी करून कारवाईची मागणी समस्त गावकर्‍यांनी केली आहे.