राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथीनिमित्त गुरुकुंज येथे मौन कार्यक्रम; पालकमंत्र्यांची उपस्थिती

0
54

अमरावती, दि. 6 : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५२ व्या पुण्यतिथीनिमित्त गुरुकुंज मोझरी येथे मौन व भजन कार्यक्रम झाला. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी या कार्यक्रमात पूर्णवेळ सहभागी होऊन राष्ट्रसंतांना वंदन केले. यानिमित्त समस्त गुरुदेवभक्तांनी हे जग कोरोनामुक्त होऊन सर्वांना निरामय आरोग्य लाभो, अशी प्रार्थनाही केली.

विविध ठिकाणांहून सहभागी झालेल्या गुरूदेवभक्तांच्या उपस्थितीत मोझरी येथील गुरुकुंज आश्रमातील प्रार्थना मंदिर परिसरात अत्यंत मंगलमय वातावरणात हा मौन कार्यक्रम झाला. पालकमंत्री श्रीमती ठाकूर, चिमूरचे आमदार बंटी भांगडिया, जिल्हा परिषद सभापती पूजा संदीप आमले, डॉ. राजाराम बोथे आदी  यावेळी उपस्थित होते.

‘गुरुदेव हमारा प्यारा, है जीवनका उजियारा’ या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मानवतेचे महान पुजारी व देशविकासासाठी ग्रामविकासाचा संदेश देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विविध रचना, भजने यावेळी गुरूदेवभक्तांनी म्हटली. कोरोना साथीचा नायनाट होऊन सर्वांना निरामय आरोग्यासाठी प्रार्थनाही यावेळी करण्यात आली. गुरूदेवभक्तांनी ‘ए भारत के प्यारे भगवन’,‘संत मायबाप, ऐका माझी हाक’, ‘हम आशिक है तेरे दर्शनके ए नाथ किवाडे खोल जरा’ अशी राष्ट्रसंतांची विविध भजने यावेळी गायली. विविधतेत एकता, ग्रामविकास, राष्ट्रभक्ती, श्रमसंस्कार अशी मूल्ये रूजविणाऱ्या भजन व प्रार्थनेने गुरूकुंजातील वातावरण भक्तिमय झाले होते.

श्री रामदेवबाबा यांनीही दिला संदेश

पतंजली योगपीठाद्वारे श्री रामदेवबाबा यांनीही यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संदेश दिला. राष्ट्रसंतांनी संपूर्ण जगाला मानवतेचा विचार दिला. आज एकविसाव्या शतकात गुरुदेवांचे विचार शांतीच्या प्रतिष्ठापनेसाठी व भारताला परमवैभवाप्रत नेण्यासाठी अंगीकारणे आवश्यक असल्याचे रामदेव बाबा यांनी सांगितले.  यानंतर शांतीपाठ झाला.सर्वधर्मीय प्रार्थनाही यावेळी झाली. बौद्ध, शीख, जैन, ख्रिश्चन व मुस्लिम धर्माच्या प्रार्थना गुरुदेवभक्तांनी म्हटल्या. नंतर आरती करण्यात आली. ‘मंगलनाम तुम्हार प्रभू’ या सामुदायिक प्रार्थनेने या सोहळ्याचा समारोप झाला.