देवरी कृउबासावर राकाँपाचा कब्जा

0
15

सुरेश भदाडे
देवरी,दि. ३१:- गोंदिया जिल्ह्यात नव्याने स्थापन झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती देवरीच्या पहिल्या निवडणुकीत १९ संचालकांपैकी १५ संचालक निवडून राष्ट्रवादी काँग्रेसने बाजार समितीवर वर्चस्व मिळविले आहे.बाजार समितीसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज सोमवार (ता.३१) येथील आफताब मंगल कार्यालयात पार पडली. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे १५ उमेदवार संचालक पदी निवडून आले. तर भाजप-काँग्रेस युतीमधून फक्त ४ उमेदवार संचालक पदी निवडून आले. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला आपला खाताही उघडता आला नाही.काँग्रेस-भाजपने युती केली होती.तर राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढली.
नवनिर्मित देवरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १९ संचालक पदाकरिता घेण्यात आलेल्या निवडणुकीत सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण गटातून एकूण २०८ मतदारांनी मतदान केले. यात १७ मते अवैध ठरली. विजयी उमेदवारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश ताराम, विजय कच्छप, गोपाल राऊत, रियाफ खान, सिताराम रक्षा, अनिल वालदे, तर भाजप-काँग्रेस युतीचे भाजपाध्यक्ष प्रमोद संगीडवार, महिला राखीव गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गा तिराले, सौ. पुनियाबाई मडावी, अनुसूचित जमाती राखीव गटातून श्रीराम मडावी, इतर मागासवर्ग राखीव गटातून भास्कर धरमशहारे, तर ग्रामपंचायत सर्वसाधारण गटातून ४१५ मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी २६ मते अवैध ठरली. यात भाजप-काँग्रेस युतीचे डॉ. जितेन्द्र रहांगडाले, आणि कमल येरणे, आर्थिक दुर्बल घटक राखीव गटातून राकाँपाचे द्वारका धरमगुळे, अनुसूचित जाती/जमाती राखीव गटातून हरिदास राऊत तर व्यापारी व अडत्या गटातून एकूण १४८ मतदारांनी मतदान केले. यात १ मत अवैध ठरले. यात अनिल अग्रवाल, तसेच विपणन व प्रक्रिया गटातून एकूण १३ मतदारांनी मतदान केले होते. यात राकाँपाचे भैय्यालाल चांदेवार निवडून आले. हमाल तोलारी गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे मारोती खंडारे हे पूर्वीच अविरोध निवडून आले आहे. अशाप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसने माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल, आमदार राजेंद्र जैन, व माजी जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर यांच्या मार्गदर्शनात भंडारा अर्बन बँकेचे अध्यक्ष महेशकुमार जैन यांच्या कुशल नेतृत्वात १५ संचालक निवडून आणले.