सडक-अर्जुनी दि.५: डोंगरगाव/डेपो सहवनक्षेत्रांतर्गत पुतळी/फाट्याजवळ राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर एक बिबट पहाटे ३ वाजता मृतावस्थेत आढळला. हा बिबट दोन वर्षाचा असल्याचे सांगितले जाते. अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला.
गस्तीवर असलेल्या वनविभागाच्या पथकाने वरिष्ठांना कळविले. गोंदियाचे सहायक वनसंरक्षक यु.टी. बिसेन, वनपरिक्षेत्र अधिकारी गोवर्धन राठोड, वनपाल गडवार, वनरक्षक वासुदेव गहाणे व वन कर्मचार्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. बिबड्याचा कोणताही अवयव चोरीला गेला नव्हता. उत्तरीय तपासणी करुन त्या बिबट्याचा मृतदेह जाळण्यात आला. राष्ट्रीय महामार्गाला लागूनच नवेगाव अभयारण्य आहे. वन्यप्राणी रात्रीच्या वेळी रस्ता ओलांडताना वाहनांची त्यांना धडक बसते. देवपायली ते डुग्गीपार आणि डोंगरगाव डेपो ते मासुलकसा घाट या रस्त्यावर नेहमी वन्यप्राण्यांचे अपघात होत असतात.