भंडारा दि.8: जातीय भेदभावाचा सामना करणार्या तसेच अत्याचार सोसणार्या दलीत समाजाला संरक्षण देण्यासाठी अँट्रासिटी कायदा बनविण्यात आला होता. या कायद्यामुळे जातीच्या आधारावर अत्याचार कमी झाले. परंतु काही लोकांकडून आपल्या गोरखधंद्यावर पडदा घालण्यासाठी ‘अँट्रासिटी’ कायद्याचा दुरुपयोग होत आहे. दुरुपयोग करणार्या लोकांची पार्श्वभूमी आणि त्यांचा उद्देश तपासून कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते परमानंद मेश्राम यांनी केली आहे.
भंडारा जिल्ह्यात झालेल्या एकामागून एक अशा तीन घटना घडल्यानंतर अँट्रासिटी कायद्यांतर्गत होणार्यात तक्रारीसंदर्भात ते म्हणाले, भंडारा शहरात गांजा व्यवसायिकांविरुद्ध नागरिकांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर टाकळी येथील नागरिकांनी एका गांजा व्यावसायिकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर या व्यावसायिकांनी अँट्रासिटी कायद्यांतर्गत टाकळी वासीयांच्या विरोधात तक्रार दिली.
भंडारा येथील सहकारनगर येथे अतिक्रमण कारवाईदरम्यान नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. एका राजकीय पदाधिकार्याने नगर पालिकेच्या कर्मचार्याच्या थोबाडीत हाणली. त्यांच्या अटकेच्या मागणीमुळे पालिका कर्मचार्यांनी आंदोलन केले. मारहाणीच्या दोन दिवसानंतर पालिका कर्मचार्याच्या विरुद्ध अँट्रासिटी कायद्यांतर्गत तक्रार देण्यात आली.
पवनी येथील तहसील कार्यालयात झालेल्या वादानंतर तहसीलदार आणि पुरवठा निरिक्षक यांच्याविरुद्ध अँट्रासिटी कायद्यांतर्गत तक्रार देण्यात आली. त्यानंतर महसुल कर्मचार्यांनी लेखणीबंद आंदोलन पुकारले. हे आंदोलन भंडार्यात जिल्हाधिकारी यांच्याकडे नेण्यात आले.
जिल्हाधिकार्यांनी पुढाकार घेत महसूल कर्मचार्यांच्या मागण्यांचे शिष्टमंडळ घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे घेऊन गेले.तिथे अधिकारावरुन जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्यातच खडाजंगी झाली. त्यानंतर पोलिसांनी मारहाण करणार्यांना अटक केली. अटकेतील लोक जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा त्यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन आता पवनीचे तहसीलदार व पुरवठा निरीक्षक यांच्याविरुद्ध अँट्रासिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
त्यामुळे पूर्वीच्या तक्रारीत जातिवाचक शिवीगाळ नसताना अटक केल्यानंतरच्या तक्रारीत जातिवाचक शिवीगाळ केल्याची खोटी तक्रार करण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे हा कायद्याचा दुरुपयोग नाही कां? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे अँट्रासिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करताना पोलीस प्रशासनाने दुरुपयोग करणार्या लोकांची पार्श्वभूमी आणि त्यांचा उद्देश तपासून कारवाई करण्याची गरज आहे. जेणेकरुन दोन समाजातील एकोपा कायम ठेवता येऊ शकतो, कायद्याचा दुरुपयोग करण्याच्या प्रकारामुळे दोन समाजातील कटूता वाढत आहे, त्यामुळे यावर आळा घालण्याची मागणीही परमानंद मेश्राम यांनी केली आहे.