चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीवर शेतकरी सहकारी पॅनलचा झेंडा

0
20

गडचिरोली दि. १६: राजकीय क्षेत्रातील मंडळींचे लक्ष लागलेल्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांच्या निवडणुकीत बाजार समितीचे विद्यमान सभापती अतुल गण्यारपवार यांच्या नेतृत्वातील व काँग्रेस समर्थित शेतकरी सहकारी पॅनलने तब्बल १६ जागा जिंकून बाजार समितीवर दुसऱ्यांदा निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले.

चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीवर यापूर्वी अतुल गण्यारपवार यांच्या पॅनलची सत्ता होती. परंतु काल १४ सप्टेंबरला झालेल्या निवडणुकीत भाजपने जोरदार तयारी करुन गण्यारपवारांच्या पॅनलच्या विरोधात आपले उमेदवार उभे केले होते. मात्र आज पार पडलेल्या मतमोजणीत अतुल गण्यारपवार याच्या शेतकरी सहकारी पॅनेलने तब्बल १६ जागा जिंकून विरोधकांना चारी मुंडया चीत केले.

या निवडणुकीत गण्यारपवारांच्य शेतकरी सहकारी पॅनलचे ग्रामपंचायत गटातील सर्वसाधारण गटातून रामचंद्र बामनकर(३९६), निकेश गद्देवार(४०६),आर्थिकदृष्टया दुर्बल गटातूमन सतीश रॉय(३८५) विजयी झाले. भाजपासमर्थित बंडूजी चिळंगे, बाजार समितीचे माजी सभापती शरद कोलेट्टीवार, विलास धोंगडे, उमेश कुबडे, किशोर पोरटे यांना पराभवाचा सामना करावा लागला.

सेवा सहकारी गटातील सर्वसाधारण गटातून अरुण बंडावार(२८१), अतुल गण्यारपवार(३००),जानकीराम कुसनाके(२६३), परमानंद मलिक(२७५), सुधाकर निखाडे(२८८), गोसाई सातपुते(२८१) व शंकर वंगावार(२५६) विजयी झाले. महिला गटातून वंदना मडावी व कौशल्या पोरटे निवडून आल्या. इतर मागासवर्गीय गटातून विनायक आभारे(२७६), भटक्या व विमुक्त जाती गटातून गणपती भेंडारे(२७८) हे ११ उमेदवार विजयी झाले. हमाल गटातून अनिल नैताम हे अपक्ष म्हणून निवडून आले. पणन गटातून अमोल गण्यारपवार, मापारी गटातून चंद्रकांत दोषी व शामराव लटारे आणि ग्रामपंचायत गटातील अनुसूचित जाती-जमाती गटातून आधीच अविरोध निवडून आले आहेत.

या निवडणुकीत भाजपचे सर्व लोकप्रतिनिधींनी गण्यारपवारांच्या विरोधकांना एकत्र करुन जोर लावला होता. परंतु त्यांच्या पदरी अपयश आले. प्रवीण निनावे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. पोलिस निरीक्षक किरण अवचार यांच्या नेतृत्वात पोलिसांनी सुरक्षा ठेवली होती.

निवडणुकीचा निकाल घोषित झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करुन विजयी रॅली काढली. या रॅलीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, अहेरीचे माजी आमदार दीपक आत्राम, जिल्हा परिषदेचे वित्त व बांधकाम सभापती व बाजार समितीचे संचालक अतुल गण्यारपवार यांच्यासह प्रमोद वायलालवार, संजय वडेट्टीवार, सुरेश भांडेकर, राजेश ठाकूर, काशिनाथ कोहळे, वैभव भिवापुरे, राहुल नैताम, विनोद खोबे, सुमेध तुरे, राजू आत्राम, गुरुदास चुधरी, विजय शांतलवार, सुधीर गडपायले, प्रभाकर कुमरे, विठठल कुनघाडकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.