जि.प.प.स.कर्मचारी पतसंस्थेची आमसभा १५ मिनिटात गुंडळल्याचा विरोधी संचालकांचा आरोप

0
5

गोंदिया,दि.२०-येथील जिल्हा परिषद व पंचायत समिती कर्मचारी सहकारी संस्थेची आमसभा आज (दि.२०)रविवारला मयूर लॉन येथे घेण्यात आली.सभा सुरू होताच काही संचालक व सदस्यांनी पतसंस्थेत घोळ असल्याचा आरोप करीत ही आमसभा पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी केली.तसेच अध्यक्ष व सचिवांनी संस्थेतील घोळ लपविण्यासाठी आमसभा १५ ते २० मिनिटातच गुंडाळल्याचा आरोप सदस्यांनी केला.
तर गोंदिया जिल्हा परिषद व पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्थेत कुठलाही गैरव्यवहार झालेला नाही.गेल्या अनेक वर्षापासून पतसंस्थेतील सत्ताधारी गैरव्यवहार करीत असल्याचा आरोप करण्याची सवय विरोधकांना झाली असून संस्थेच्या हितासाठी आणि सभासदांच्या हितासाठीच योग्य ते निर्णय संचालक मंडळ घेत असल्याचे संस्थेचे सचिव संजय बनकर यांनी सांगत विरोधकांचे आरोप फेटाळून लावले आहेत.
जेव्हा की सभा तासभर चालल्याचे काही सदस्यांचे म्हणणे आहे.या आमसभेला जिल्ह्यातून सहाशे ते सातशेच्या जवळपास सदस्य उपस्थित झाले होते.पण विरोधी गटातून निवडून आलेले जे संचालक होते त्यांनी सत्ताधारी संचालकासोबत न बसता सभागृहात सामान्य सदस्यांसोबत बसणेच पंसद केले.जेव्हा अध्यक्ष व सचिवांनी त्या संचालकांना वारंवार मंचावर येऊन बसण्याचे आवाहन केले,परंतु त्यांनी त्यास काही समर्थन दिले नाही.
आमसभेला सर्व संचालक आणि संस्थेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुपारी १२ . ३० वाजताच्या सुमारास संस्थेच्या आमसभेला सुरवात करण्यात आली.आणि विषयानुरूप चर्चा सुरू करण्यात आली दरम्यान सत्ताधारी मंडळीनी स्वतःच ठराव मंजूर करण्याचा सपाटा लावल्याने विरोधी गटात असलेले संचालक लिलाधर qतबुडे, वनिता ठाकूर, सुभाष सिरसाम, कैलेंद्र बिसेन, सचिन कुथै, नरेंद्र अतकरी, दयानंद फटींग, श्रीधर आदमने आदींनी काही विषयावर आक्षेप नोंदविला.
विरोधी गटातील संचालकानुसार संस्थेचे अध्यक्ष व सचिवांनी संस्थेत दीड कोटी रुपयाचा गैरव्यवहार केला असून तो लपविण्यासाठी आमसभा आटोपल्याचा आरोप केला.तसेच जलयुक्त शिवार योजनेचे दोन लाख ४० हजार रुपये संचालक मंडळाची कुठलीच परवानगी न घेता नियमबाह्यरीत्या खर्च केल्याचा आरोप पत्रकात केला आहे.कार्यालयात गरज नसताना सिसिटिव्ही कॅमेरे खरेदी करण्यावर तीन लाख रुपये नियमबाह्य खर्च केल्याचाही आरोप या पत्रकात करण्यात आला आहे.
२०१४ – १५ या आर्थिक वर्षात संस्थेला ६८ लाख ८६ हजार ४४६ रुपयाचा निव्वळ नफा असून या निधीचा नियमानुसार विनियोग करण्यात आला नाही.यात किरकोळ खर्च हा १ लाख ७३ हजार ६२८ रुपये मोघम स्वरूपात दाखवून आमसभेची दिशाभूल करण्यात आल्याचेही म्हटले आहे.तसेच या सर्व प्रकरणात जिल्हा उपनिबंधक आणि आयुक्ताकंडे तक्रार करणार असल्याचे विरोधी पक्षाच्या संचालकानी म्हटले आहे.