शरद पवारांनी दिली सोयाबीन,संत्रा उत्पादकांच्या शेतीला भेट

0
9

नागपूर,दि.22-राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार सध्या विदर्भाच्या दौर्‍यावर आहेत. पहिल्यांदाच ते आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुंटुबियांची भेट घेणार आहेत. महत्वाचे म्हणजे पवार केंद्रीय कृषीमंत्री असतांनासुद्धा त्यांनी कधीच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुंटुबियांची भेट घेतली नव्हती. त्यामुळे त्यांच्या या दौर्‍याकडे सर्वाच लक्ष लागून आहे.आज त्यांनी माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत काटोल तालुक्यातील संत्रा,सोयाबीन उत्पादक शेतकर्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली.पवारांच्या या दौर्याने शेतकरीवर्गाचे कमी परंतु राष्ट्रवादीच्या कार्यकत्यार्ंचे चांगले भले होणार असून त्यांच्या पक्षवाढीसाठी प्रोत्साहन करण्याकरिताच पवार आल्याचे बोलले जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिलेल्या पिंपरी बुटी इथं ते जाणार आहेत. या गावात शांताबाई प्रल्हाद ताजने यांच्या घरी भेट देणार आहेत. शांताबाई ताजने यांच्या पतीने आत्महत्या केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भेट घेतली होती. पण या भेटीतूनही शांताबाईंना धीर मिळाला नाही. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर त्यांनी आत्महत्या केली होती. साधारण गेल्या मार्च महिन्यात मुख्यमंत्र्यांनी या पिंपरी बुटीला भेट दिली होती. त्याच गावात आता पवारही भेट देणार आहेत. म्हणूनच शरद पवारांचा हा विदर्भ दौरा राजकीय फायदा उठवण्यासाठी तर नाहीना असा आरोप सत्ताधार्‍यांकडून होत आहे.