नगर पंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर: १ नोव्हेंबरला निवडणूक

0
10

गोंदिया, दि.२८ : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ६७ नवनिर्मित नगर पंचायतींच्या सार्वत्रिक व १२ नगर परिषदांच्या १७ जागांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, आज मध्यरात्रीपासून आचारसंहिता लागू झाली आहे.गोंदिया व भंडारा जिल्ह्यात एकाच टप्यात 1 नोव्हेंबरला होईल.2 नोव्हेंबरला मतमोजणी करण्यात येणार आहे. गडचिरोली जिल्हयात दोन टप्प्यात निवडणूक होणार आहे. गोंदिया जिल्ह्यात गोरेगाव,सडक अजुर्नी,सालेकसा,देवरी,अर्जुनी मोरगाव तर भंडारा जिल्ह्यात लाखादूंर,लाखनी,मोहाडी येथे नगरपंचायतीची व साकोली नगरपरिषदेची निवडणुक होणार आहे.
२१ जिल्हयांमधील ६७ नवनिर्मित नगर पंचायतींच्या सार्वत्रिक व व १० जिल्हयांमधील १२ नगर परिषदांच्या १७ रिक्त पदांची पोटनिवडणूक घेण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने आज जाहीर केला असून, संबंधित जिल्हयाच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. निवडणुकीसंबंधीची आचारसंहिता आज १२ वाजतापासूनच सुरु झाली आहे. बहुतांश जिल्हयांमध्ये १ नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. मात्र गडचिरोली जिल्हयात १ व ६ नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. चामोर्शी, अहेरी, एटापल्ली, सिरोंचा, मुलचेरा व भामरागड नगर पंचायतींची निवडणूक १ नोव्‍हेंबरला होणार आहे, तर आरमोरी, कुरखेडा, कोरची व धानोरा नगर पंचायतीची निवडणूक ६ नोव्हेंबरला होणार आहे. जिल्हाधिकारी २९ सप्टेंबरला निवडणूकविषयक कार्यक्रम जाहीर करणार आहेत. या कार्यक्रमानुसार, १ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबरपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजतापर्यंत उमेदवारांना त्यांचे नामनिर्देशनपत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करावयाचे आहेत. मात्र २ ऑक्टोबर, ४ ऑक्टोबर व रविवार या सुटीच्या दिवशी नामनिर्देशनपत्र स्वीकारले जाणार नाही. ९ ऑक्टोबरला नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात येणार असून, याच दिवशी वैध नामनिर्देशनपत्रांची प्रसिद्धी करण्यात येईल. त्यानंतर १९ ऑक्टोबरपर्यंत इच्छुकांना त्यांचे नामनिर्देशनपत्र मागे घेता येतील. १ नोव्हेंबरला सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच वाजतापर्यंत मतदान होईल.