अभ्यासक्रमातून बाबासाहेबांचा इतिहास वगळला :आंबेडकरी संघटनांचे निवेदन

0
20

गोंदिया दि.१: केंद्रीय अभ्यासक्रम आयसीएसईच्या दहाव्या वर्गाच्या इतिहास ‘टोटल हिस्ट्री अँन्ड सिव्हिक्स’ नामक पुस्तकातून भारतीय संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इतिहासाचा उल्लेखच करण्यात आला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांनी राष्ट्रपती, प्रधानमंत्री व मानव संसाधन विकास मंत्री यांच्या नावे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देवून विरोध व्यक्त केला.
इतिहासाच्या सदर पुस्तकाचे प्रकाशन मॉर्निंग स्टार पब्लिकेशन नवी दिल्लीद्वारे करण्यात आले. वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील डॉली एलन नामक महिलेने या पुस्तकाचे लेखन केले आहे. तर बंगलुरू येथील रहिवासी एस. इरूदया राजने पुस्तकाचे संपादन केले आहे.
या वेळी आंबेडकरवादी प्रतिनिधी मंडळाने दिलेल्या निवेदनानुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देशातीलच नव्हे तर संपूर्ण विश्‍वातील नवीन पिढी व विद्यार्थ्यांचे प्रेरणास्त्रोत आहेत. विश्‍वातील अनेक देशांनी त्यांच्या बुद्धिमत्तेवर आस्था ठेवून त्यांचे पुतळे स्थापित करून आपला आदर व्यक्त करीत आहेत. परंतु देशातील मनुवादी मानसिकता बाबासाहेबांचा इतिहास दडपण्याचा निंदनीय प्रयत्न करीत आहे. त्यामुळे येणारी पिढी बाबासाहेबांचे अमूल्य कार्य व ज्ञानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
या इतिहासाच्या पुस्तकात महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू यांच्यासह राष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष व क्रिकेटर सचिन तेंदूलकरलाही स्थान देण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इतिहासाचा त्वरित सदर इतिहासाच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात यावा व पूर्वप्रकाशित पुस्तिकेला अभ्यासक्रमातून हटविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंबेडकरवादी संघटनांनी दिला आहे.याप्रसंगी प्रतिनिधी मंडळात यशपाल डोंगरे, विलास राऊत, अशोक बेलेकर, उमेश नागदेवे, मुकेश ठवरे, मनिष मेश्राम, विक्की बघेले, राजेश चौरे, दिपेंद्र वासनिक, नागेश चव्हाण, राजन चौबे, शुद्धोदन शहारे, निलेश देशभ्रतार, अनिल सुखदेवे, वसंत गणवीर, आसिफ अंसारी, राजेश मेश्राम व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.