पोलिसांची दंडुकेशाही : नरेंद्र भोंडेकर

0
18

भंडारा दि.१: शहरात पोलिसांची दंडुकेशाही वाढली आहे. मात्र याकडे खासदार, आमदारांसह अधिकार्‍यांचे दुर्लक्ष होत आहे. याचा प्रत्येय मंगळवारी गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान दिसून आला. गणेश भक्तावर अन्याय झाला आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी माजी आ. नरेंद्र भोंडेकर यांनी पत्रपरिषदेत दिली.
शहरातील बजरंग गणेशोत्सव मंडळाने काढलेल्या विसर्जन मिरवणुकीवर शहर पोलिसांनी लाठीमार केला. हा हिंदू धर्मावर आघात आहे. मंडळा विरोधात कायदेशीर कारवाई करायला पाहिजे. मात्र पोलीस विभागातर्फे सुनियोजित कट असल्याप्रमाणे भक्तांना झोडपून काढले. लाठीमार करताना परवानगीची गरज असते याचे भानसुद्धा पोलिसांना नव्हते. एवढे असतानाही शासन तथा अधिकार्‍यांचे दुर्लक्ष असणे दुर्भाग्य आहे. लाठीमार करणार्‍या सर्व अधिकार्‍यांना निलंबित करावे, अशी मागणी भोंडेकर यांनी केली. शहरात शांततेचे वातावरण निर्माण करावे यासाठी लोकप्रतिनिधींसह पोलीस विभागाकडून तसेच गृह विभागाकडून सहकार्य मिळणे गरजेचे आहे. मात्र असे होताना दिसत नाही. लाठीमारसंदर्भात न्यायासाठी न्यायालयात जनहित याचिका घालून न्यायालयीन चौकशीची मागणी करणार आहे. वेळप्रसंगी नागरिकांच्या सुरक्षेसाठी आंदोलन करणार आहे. पत्रपरिषदेला सुरेश धुर्वे, संजय रेहपाडे, अनिल गायधने उपस्थित होते.