पीआरसीच्या गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

0
5

नागपूर दि.१: महिनाभरापासून जिल्हा परिषद प्रशासनामध्ये पंचायत राज समिती(पीआरसी)च्या दौर्‍यावरून दबाव निर्माण झाला होता. विधिमंडळाची प्रतिकृती असलेल्या या समितीचे कामकाज अतिशय गोपनीय होणार होते. परंतु पहिल्याच दिवसाच्या कामकाजात समितीच्या सदस्यांनी गोपनीयता न पाळल्याने समितीच्या गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
समितीच्या अध्यक्षांनी कामकाजापूर्वीच अधिकार्‍यांना कामात हयगय खपवून न घेण्याचा इशारा दिला होता. समितीच्या दौर्‍याच्या पहिल्या दिवशी कामकाजही तेवढय़ाच गांभीर्याने सुरू झाले. अध्यक्षांनी समितीच्या गोपनीयतेबद्दल माहिती देताच कामाव्यतिरिक्त अन्य विभागातील इतर अधिकार्‍यांनी सभागृहातून काढता पाय घेतला. सभागृहात केवळ जिल्हा परिषद अध्यक्ष, समितीचे अध्यक्ष, ११ सदस्य, सीईओ आणि प्रत्येक विभागाचे अधिकारी उपस्थित होते. २00८-0९ आणि २0११-१२ च्या लेखा परीक्षणाचे अहवाल समितीपुढे सादर करण्यात आले. यावेळी समितीला कामकाजात गुणवत्तेचा अभाव आढळून आला. अधिकार्‍यांच्या कामकाजात ढिसाळपणा समितीला आढळला.
हे सर्व कामकाज बंदद्वार आणि गोपनीय होते. नियमानुसार कामकाजाची इतरत्र कुठेही वाच्यता होऊ द्यायची नव्हती. परंतु समितीच्या काही सदस्यांनी कामकाजाची इत्थंभूत माहितीच उघड केली. सदस्यांनी केला. समितीला कामकाजाचा संपूर्ण वृत्तांत आपल्या अहवालात नमूद करायचा आहे. तो विधिमंडळाच्या पटलावर ठेवायचा आहे. परंतु यापूर्वीच अहवाल उघडकीस आल्याने समितीच्या गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.