दहा वर्षांत ५०२ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

0
12

 गडचिरोलीतील ४८३ नक्षलवाद्यांची मुख्य प्रवाहाकडे वाटचाल
 पोलिसांची विशेष रणनिती व सुसंवादाचे यश
नागपूर, दि. ५ – राज्यातील नक्षलवाद्यांच्या चळवळीचा बिमोड करण्याचा पोलिसांचा निर्धारः.नक्षलवाद्यांना टिपण्यासाठी अहोरात्र पोलिसांची गस्तः..जंगलात नक्षल्यांच्या गोळीला गोळीनेच उत्तरःःतर चळवळ सोडून येणा-या नक्षलवाद्यांना मानवतेची वागणूकःःआत्मसमर्पण योजना नक्षलवाद्यांपर्यंत पोहचविण्यात पोलिसांची विशेष रणनीती यशस्वीः.मग काय चळवळीतील नक्षलवाद्यांचाही या योजनेला प्रचंड प्रतिसादः.त्याचीच फलनिष्पत्ती म्हणून सन २०१३ मध्ये ४९, सन २०१४ मध्ये ४० आणि सन २०१५ च्या सप्टेंबर महिन्यापर्यंत २५, अशा अडीच वर्षांच्या कालावधीत तब्बल ११४ नक्षलवाद्यांसह दहा वर्षांत आतापर्यंत एकूण ५०२ नक्षलवाद्यांनी बंदुका खाली ठेवून शांततेचा मार्ग स्वीकारला आहे. यात गडचिरोलीतील ४८३ नक्षलवाद्यांचा समावेश आहे.
नक्षल चळवळीत भरकटलेला आदिवासी बांधव लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात यावा, या उद्देशाने राज्य शासनाने २९ ऑगस्ट २००५ पासून आत्मसमर्पण योजना सुरु केली. योजना सुरु झाल्यानंतर लगेच एका महिन्यात म्हणजे २५ सप्टेंबर २००५ रोजी नक्षली चळवळीत दलम सदस्य असलेला जहाल नक्षलवादी मदनअय्या उर्फ बालना बलय्या याच्या आत्मसमर्पणाने योजनेला पहिले यश प्राप्त झाले. आत्मसमर्पण योजना सुरू झाल्यापासून सन २००५ ते २०१५ या दहा वर्षांच्या कालावधीत आत्तापर्यंत गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील ५०० नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. यामध्ये १ स्टेट झोनल कमेटी सदस्य, ६ डिव्हीजनल कमेटी सदस्य, १६ कमांडर, २४ उपकमांडर, २१८ दलम सदस्य, ११० क्षेत्रीय/ग्रामरक्षक दल सदस्य, १२७ संगम सदस्य यांचा समावेश आहे.
सन २००५-२००६ या वर्षात एकूण ५ दलम सदस्य, ५ क्षेत्रीय/ ग्रामरक्षक दल सदस्य, ६१ संगम सदस्य अशा एकूण ७१ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करून नवजीवनाची वाट धरली. सन २००६-२००७ या वर्षात ३ उपकमांडर २२ दलम सदस्य, ९ क्षेत्रीय व ग्रामरक्षक दल सदस्य, ३२ संगम सदस्य अशा एकूण ६६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. सन २००७-२००८ या वर्षात १ कमांडर, १ उपकमांडर, २३ दलम सदस्य, ७ क्षेत्रीय व ग्रामरक्षक दल सदस्य, ७ संगम सदस्य अशा एकूण ३९ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. सन २००८-२००९ या वर्षात १ डिव्हीजनल कमेटी सदस्य, ४ कमांडर, ५ उपकमांडर, ३४ दलम सदस्य, ७६ क्षेत्रीय व ग्रामरक्षक दल सदस्य, २४ संगम सदस्य अशा एकूण १४४ नक्षलवाद्यांनी शांततेचा मार्ग स्वीकारला. सन २००९-२०१० मध्ये स्टेट झोनल कमेटी सदस्य रैना उर्फ रघू उर्फ जालमलाय लालुसाय सडमेक याने आत्मसमर्पण केल्यामुळे पोलिसांना फार मोठे यश प्राप्त झाले. या वर्षात गडचिरोली जिल्ह्यात १ स्टेट झोनल कमेटी सदस्य, १ कमांडर, १० दलम सदस्य असे एकूण १२ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. सन २०१०-२०११ या वर्षात १ डिव्हीजनल कमेटी सदस्य, १८ दलम सदस्य, २ क्षेत्रीय व ग्रामरक्षक दल सदस्य अशा २१ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. सन २०११-२०१२ या वर्षात ३ कमांडर, ३ उपकमांडर, १० दलम सदस्य, ३ क्षेत्रीय व ग्रामरक्षक दल सदस्य अशा १९ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. सन २०१२-२०१३ या वर्षात ३ कमांडर, २ उपकमांडर, १० दलम सदस्य, १ क्षेत्रीय व ग्रामरक्षक दल सदस्य असे १६ नक्षलवादी मुख्य प्रवाहात आले. सन २०१३ या वर्षात ३ डिव्हीजनल कमांडर, १ कमांडर, ३ उपकमांडर, ४० दलम सदस्य, २ क्षेत्रीय व ग्रामरक्षक दल सदस्य अशा एकूण ४९ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. सन २०१४ मध्ये १ डिव्हीजनल कमांडर, ३ कमांडर, ६ उपकमांडर, ३० दलम सदस्य अशा एकूण ४० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. यावर्षी सप्टेंबर २०१५ पर्यंत २ उपकमांडर, १६ दलम सदस्य, ७ क्षेत्रीय व ग्रामरक्षक दल सदस्य असे एकूण २५ नक्षलवाद्यांनी लोकशाहीचा मार्ग स्वीकारला. २०१३ च्या नवव्या टप्प्यात सर्वाधिक ११ नक्षल जोडप्यांनी आत्मसमर्पण केले, हे विशेष. नक्षल चळवळीत राहून काम करणे जिवासाठी धोकादायक, तसेच वैवाहिक सुख उपभोगता येत नसल्याची बाब लक्षात आल्यावर आतापर्यंत नक्षल चळवळीत पती-पत्नी म्हणून काम करणा-या एकूण ३० जोडप्यांनीही या योजनेंतर्गत आत्मसमर्पण केले आहे.
विशेष म्हणजे गडचिरोली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी नक्षल चळवळीचा पुरता बिमोड करण्यासाठी आत्मसमर्पण योजनेचा अतिशय प्रभावीपणे वापर करण्याची रणनीती आखली आहे. जंगलात नक्षलवाद्यांविरोधात बंदुकीच्या माध्यमातून लढा देणा-या गडचिरोली पोलिसांकडून जनसंवादावर विशेष भर देण्यात येत आहे. तसेच आत्मसमर्पण केल्यानंतर शासनाकडून देण्यात येणारी आर्थिक मदत आणि इतर लाभांचा संदेश नक्षलवाद्यांपर्यंत पोहचविण्यात पोलिस यशस्वी झाले आहेत. तसेच नक्षलवादी खोट्या भुलथापा देऊन स्थानिक आदिवासींची केवळ दिशाभूल करीत आहेत, ही बाब पटवून देण्यात पोलिसांना मोठ्या प्रमाणावर यश आले आहे. त्यामुळेच जुलै महिन्यात एकाच वेळेस गडचिरोलीतील ९ जहाल नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले असून चालू वर्षात आतापर्यंत हा आकडा २५ वर पोहचला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली या भागात नक्षलवाद्यांच्या कारवाया मोठ्या प्रमाणात होत असतात. या भागाकडे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी विशेष लक्ष केंद्रीत केले. ऐवढेच नव्हे तर या भागातील नक्षल चळवळीला पायबंद घालण्यासाठी एटापल्ली तालुक्यातील कोटमी येथे जंगलात एक तंबू उभारून पोलिस चौकी उभारण्यात आली. येथील आदिवासी बांधवांशी जवळीक साधण्याचा पोलिसांनी प्रयत्न सुरु केला. तसेच विविध योजनांची माहिती आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून पोलिसांनी नागरिकांची मने जिंकली व आपल्या प्रती नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण केला. येथील नागरिकांना पोलिसांनी लोकशाहीचे महत्त्व, शासकीय योजनांचा लाभ, आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द असलेले शासन, नक्षल्यांच्या हिंसक चळवळीमुळे येथील विकासावर होणारा परिणाम आणि आत्मसमर्पण योजनेची माहिती पटवून सांगितली. आत्मसमर्पण करणा-यांना आर्थिक मदतीसोबतच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि खाजगी वाहन प्रशिक्षण संस्थेमधून वाहन चालकाचे प्रशिक्षण देऊन त्यांना वाहन चालविण्याचे परवाने देणे, आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांनासुध्दा शिवणकामाचे प्रशिक्षण, काहींना इलेक्ट्रीक फिटींग, नळ फिटींगचे प्रशिक्षण (प्लम्बींग) याशिवाय काही सदस्यांनी सायकल दुरूस्ती केंद्र, पान टपरी, चहा टपरी व भाजी विक्री केंद्र सुरू करून रोजगार मिळविल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांच्या या कामगिरीमुळे नक्षली नेते चांगलेच हादरल्याचे चित्र आहे.

दहा वर्षांत पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणा-यांची संख्या खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र. आत्मसमर्पण योजनेचे टप्पे आत्मसमर्पित नक्षल्यांची संख्या
१ पहिला टप्पा (२९.८.२००५ ते २८.८.२००६ ) ७१
२ दुसरा टप्पा ६६
३ तिसरा टप्पा ३९
४ चवथा टप्पा १४४
५ पाचवा टप्पा १२
६ सहावा टप्पा २१
७ सातवा टप्पा १९
८ आठवा टप्पा १६
९ नववा टप्पा ४९
१० दहावा टप्पा ४०
११ २०१५ (सप्टेंबर २०१५ पर्यंत ) २५