पं.स. कार्यालयासमोर शिक्षक समितीचे धरणे आंदोलन

0
12

देवरी दि.११-: पंचायत समिती अंतर्गत काम करणार्‍या प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने अभूतपूर्व लक्षवेधी धरणे आंदोलन पंचायत समिती समोर करण्यात आले.
यावेळी पं.स. सभापती देवकी मरई, पं.स. सदस्य महेंद्र मेश्राम, पं.स. सदस्य सुनंदा बहेकार यांनी शिक्षक समितीच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन कामचुकार लिपिकावर कारवाई करुन समस्या मार्गी लावण्याचे निर्देश गटविकास अधिकारी एस.एन. मेश्राम यांना दिले.
धरणे आंदोलनाला तालुक्यातील शेकडो शिक्षक बांधव उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्ष मनोज दीक्षित, जिल्हा सरचिटणीस एल.यू.खोब्रागडे, उपाध्यक्ष किशोर डोंगरवार, संदीप तिडके, जी.एम. बैस, सुरेश कश्यप, तालुकाध्यक्ष गजानन पाटणकर, सरचिटणीस विनोद बहेकार, प्रकाश गावळकर, भरत खोब्रागडे, विशाल कच्छवाय, जी.ई. येळे यांनी पं.स.विरोधात संताप व्यक्त करुन १0 दिवसात मागण्या मार्गी न निघाल्यास बेमुदत उपोषणाला तयार राहण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष मनोज दीक्षित यांनी दिला.
शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांमध्ये पाचवा हप्ता त्वरित जमा करणे, निमशिक्षकांचे सप्टेंबर महिन्यापर्यंतचे वेतन अदा करणे, २ जानेवारीला नियुक्त झालेल्या शिक्षकांना आगावू वेतनवाढ लावणे, इंधन व भाजीपाला खर्च जमा करणे, मदतनिसांचे मानधन जमा करणे, त्वरित लिपिकांची नियुक्ती करणे, सेवापुस्तिका अद्यावत करणे, पुरवणी देयके जमा करणे, जिपीएफ कपात महिन्याला पाठविणे, एल.आय.सी.चे शेड्यूल २0१0 पासूनचे मागणी केलेल्या शिक्षकांना देणे, अजिर्त रजा प्रकरणे निकाली काढणे आदी मागण्यांसंदर्भात त्वरित तोडगा काढण्याचे निर्वेश सभापती यांनी गटशिक्षणाधिकारी किशोर भांडारकर यांना दिले.