“महागाई विरुद्ध मनसेचा महामोर्चा, सरकार विरोधी घोषणा”

0
10

गोंदिया,दि.18- महाराष्ट्र नवनिर्माण सेना गोंदिया जिल्हा शाखेच्यावतीने शनिवारला (दि.१७) जिल्हाध्यक्ष मनीष चौरागडे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर महागाई विरोधी मोर्चा काढून राज्यसरकारचा निषेध नोंदवण्यात आले.नेहरूचौकातून मोर्च्याला सुरवात करण्यात आली. हा मोर्चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गोंदिया शहरातून निघाल्यानंतर काढण्यात आला. मोर्चा गोरेलाल चौक – गांधी प्रतिमा – जयस्तंभ चौक नंतर आंबेडकर चौक आणि तहसील कार्यालय परिसरात पोचला. मोर्च्यात सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या “सेना- युती सत्तेत मस्त, जनता महागाईने त्रस्त”, “अच्छे दिन – हाय हाय“ अशा घोषणांनी शहर दणाणून सोडले. मनसे शहर अध्यक्ष सुरेश ठाकरे यांनी जाहीर सभेचे संचालन केले.यावेळी जिल्हाध्यक्ष मनीष चौरागडे म्हणाले की, अच्छे दिन आनेवाले है म्हणत 16 मे 2014 ला भाजप सरकारला जनतेने सत्ता सोपवली. पण बघता बघता एक वर्ष लोटले, अच्छे दिन तर नाहीच पण लोकांकडे जे होत ते पण राहिलेल नाही. महागाईने सामान्य जनतेचे जगणे मुश्किल केले असून ऐन दिवाळीच्या तोंडावर डाळ महागल्या आहेत. दोन वेळचे वरणभात खाणे आता कठिन होऊन बसले असून कांदा महाग, पेट्रोल महाग, डॉलर ची किंमत वाढत आहे. नवे रोजगार नाही, शेतकरी दुष्काळाने होरपळत आहे आणि प्रधानमंत्री परदेशवाऱ्या करत आहेत.सभेनंतर तहसिलदार संजय पवार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.यावेळी जिल्हाध्यक्ष मनीष चौरागड़े, जिल्हा उपाध्यक्ष मुन्ना गवळी, मुकेश मिश्रा, मिलन रामटेककर, लेखु राहांगडाले, तालुकाध्यक्ष पिंटू चौहान, निखील ढोंगे, शैलेश जांभूळकर, शहर अध्यक्ष सुरेश ठाकरे, याशिन शेख, आत्माराम पटले, देवीलाल रावते, अभय कुरांजेकर, उदय पोफळी आणि इतर तालुका, जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.