तोंदेलच्या जंगलातून नक्षल्यांचा शस्त्रसाठा जप्त्‍ा

0
10

गडचिरोली, दि.१८: : पोलिसांनी नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना नुकताच अहेरी तालुक्यातील दामरंचा उपपोलिस ठाण्यांतर्गत तोंदेल येथील जंगलातून नक्षल्यांचा शस्त्रसाठा जप्त केला.
यासंदर्भात पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, काही दिवसांपूर्वी अहेरी तालुक्यातील लख्खामेंढा परिसरात पोलिस-नक्षल चकमक उडाली होती. या चकमकीनंतर नक्षल्यांची काही कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली होती. त्यातील नोंदीवरुन नक्षल्यांनी तोंदेल जंगलात शस्त्रसाठा लपविल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर अहेरीचे अपर पोलिस अधीक्षक प्रणय अशोक यांच्या नेतृत्वात पोलिसांनी १५ ऑक्टोबर रोजी तोंदेल जंगलात शोधमोहीम राबवून नक्षल्यांनी लपविलेला शस्त्रसाठा हुडकून काढला. १ भरमार बंदूक, १ देशी कट्टा, ३०३ रायफलची १५ जीवंत काडतुसे, एसएलआरची ३० जीवंत काडतुसे,१२ हत्तीराऊंड, आयईडीच्या बटन, १४ पिन, १ बेल स्टील, एमसीलची ५ पॉकिटे, १ वायर बंडल, गन पावडर, १ बॅनर व काही लिखित साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले. सध्या नक्षल्‍यांकडे शस्त्रसाठा कमी असल्यामुळे पोलिसांना मिळालेला शस्त्रसाठा हे मोठे यश असल्याचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील म्हणाले.