पोलिसांकडून आतापर्यंत १६४ नक्षलवाद्यांना कंठस्नान

0
13

 गत पाच वर्षात राज्यात ५२ नक्षलवादी ठार
 वर्षभरात देशात ४७ साथीदार गमाविल्याची नक्षलवाद्यांची कबुली

नागपूर, दि. १९ ह्न नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात शासनाच्यावतीने राबविण्यात येणारी आत्मसमर्पण योजना चांगलीच यशस्वी होत आहे. त्याचीच फलश्रृती म्हणून गडचिरोलीत आतापर्यंत ४८३ नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहाची वाट धरली आहे. बंदुका खाली ठेवून आत्मसमर्पण कराल तर स्वागतच, मात्र गोळी चालवाल तर त्याच भाषेत प्रतिउत्तर, अशी रनणीती गडचिरोली पोलिसांनी अवलंबिली आहे. त्यामुळेच पोलिसांना आतापर्यंत तब्बल १६४ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. नक्षलवाद्यांच्या गोळीला गोळीनेच उत्तर देणा-या महाराष्ट्र पोलिसांनी गत पाच वर्षांत ५२ नक्षलवादी ठार केले आहेत. विशेष म्हणजे गत वर्षभरात देशातील विविध ठिकाणी पोलिस आणि केंद्रीय सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत चळवळीतील ४७ साथीदारांना जीव गमवावा लागला, अशी कबुली खुद्द नक्षलवाद्यांनी पत्रकातून दिली आहे.
राज्यातील सर्वाधिक नक्षल प्रभावित जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्ह्याची ओळख आहे. अतिसंवेदनशील असलेल्या या जिल्ह्याला छत्तीसगड, आंध्रप्रदेश या राज्याची सीमा लागली आहे. या भागात मोठ्या प्रमाणात घनदाट जंगल असल्यामुळे येथे नक्षली कारवाया होतात. गत काही वर्षांपासून शासनाने नक्षल चळवळ मोडून काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली आहे. नक्षल चळवळीत भरकटलेल्या तरुण-तरुणींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याबरोबरच जंगलात पोलिसांनी विशेष रणनिती, जंगल युध्दनिती आणि गणिमीकाव्याचा अवलंब केल्यामुळे नक्षलवाद्यांना सळो की पळो करून सोडले आहे.
गडचिरोली हा जिल्हा १९८२ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यापासून वेगळा झाला. शेजारच्या आंध्रप्रदेशातून महाराष्ट्रात १९८० च्या दशकात नक्षलवादाचा प्रवेश झाला. जिल्ह्याची स्थापना होण्यापुर्वीच या भागात नक्षल चळवळ हळूहळू आपले पाय पसरत होती. याला प्रत्युत्तर देण्यासाठी शासनाने विशेष अभियान राबवून नक्षल चळवळ मोडून काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या भागात पोलिसांकडून सर्वात पहिला नक्षलवादी २ नोव्हेंबर १९८० मध्ये मारला गेला. तत्कालीन चंद्रपूर जिल्ह्यातील मोयाबीनपेठा या ठिकाणी राज्य राखीव पोलिस दलासोबत झालेल्या चकमकीत शिरपूर दलम कमांडर पेद्दी शंकर हा पोलिसांच्या गोळीचा पहिला निशाणा ठरला.
त्यानंतर चार-पाच वर्षे पोलिसांना फारसे यश मिळाले नाही. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा पोलिसांनी नक्षलवाद्यांविरूध्द आघाडी उघडली. १९८६ मध्ये एक नक्षलवादी, तर दुस-या वर्षी १९८७ मध्ये दोन नक्षलवाद्यांना पोलिसांनी यमसदनी पाठविले. नक्षलवादी गरीब आदिवासींचा ढाल म्हणून उपयोग करीत असल्यामुळे काहीवेळा पोलिसांसमोर अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे आदिवासी नागरीकांचे रक्षण करून नक्षलवाद्यांना टिपणे, पोलिसांसमोर एक आव्हान होते. या आव्हानाला स्विकारून पोलिसांनी नक्षल्यांविरूध्द आपली लढाई निरंतर सुरू ठेवली आहे.

दिवस-रात्र जंगल पिंजून काढत पोलिसांनी नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यास सुरूवात केली. सन १९८६ ते १९९० या पाच वर्षांत पोलिसांनी ५ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. सन १९९१ ते १९९५ या पाच वर्षात तब्बल ३८ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. सन १९९६ ते २००० या कालावधीत ७ नक्षलवादी, सन २००१ ते २००५ या काळात १७ नक्षलवादी ठार झाले. विशेष म्हणजे १२ ऑक्टोबर २००४ मध्ये नक्षल्यांनी देवसुर रोड येथे पोलिसांना मारण्यासाठी भुसुरूंग ठेवत असतांना त्याचा स्फोट झाल्याने एका नक्षलवाद्याचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. सन २००६ ते २०१० या काळात ४४ नक्षलवादी तर गत पाच वर्षांत म्हणजे सन २०११ ते ३० सप्टेंबर २०१५ या कालावधीत सर्वाधिक ५२ नक्षलवाद्यांना पोलिसांनी यमसदनी पाठविले आहे. यात सन २०११ मध्ये ७ नक्षलवादी, सन २०१२ मध्ये ४ नक्षलवादी, सन २०१३ मध्ये सर्वाधिक २६ नक्षलवादी, सन २०१४ मध्ये १३ आणि चालू वर्षी ३० सप्टेंबर २०१५ पर्यंत ठार झालेल्यांमध्ये दोन नक्षलवाद्यांचा समावेश आहे. यावर्षी ६ सप्टेंबर २०१५ रोजी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत प्लाटून क्र. ३ चा उपकमांडर प्रमोद उर्फ मैनु पोटावी (रा. पेंदूलवाही, ता. ऐटापल्ली) आणि कंपनी क्र. १० चा सदस्य कुम्मे उर्फ रंजू उर्फ जिजा मज्जी (रा. मिडदापल्ली, ता. भामरागड) ठार झाले. तसेच पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत आतापर्यंत ५० च्यावर नक्षलवादी गंभीर जखमी झाले आहेत.
नक्षल चळवळीचा जिल्हा अशी ओळख असलेल्या गडचिरोलीत आता शासन आणि पोलिसांच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम आणि विकासात्मक योजनांची पायाभरणी होत आहे. त्यातच पोलिस दलाची सतर्कता आणि सक्षमीकरण या माध्यमातून नक्षल चळवळीचा बिमोड करणे, भरकटलेल्या युवकांना आत्मसमर्पणाचा मार्ग दाखवून त्यांचे पूनर्वसन करणे व त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणेदेखील सुरु आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून जिल्ह्याची प्रतिमा सुधारण्याच्या दृष्टीने सकारात्मक असा परिणाम दिसत आहे.

अ.क्र. वर्ष ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या
१ सन १९८० ते १९८५ १
२ सन १९८६ ते १९९० ५
३ सन १९९१ ते १९९५ ३८
४ सन १९९६ ते २००० ७
५ सन २००१ ते २००५ १७
६ सन २००६ ते २०१० ४४
७ सन २०११ मध्ये ७
८ सन २०१२ मध्ये ४
९ सन २०१३ मध्ये २६
१० सन २०१४ मध्ये १३
११ ३० सप्टेंबर २०१५ पर्यंत २