जिल्हा परिषद अध्यक्ष कुत्तरमारे यांच्यावर गुन्हा दाखल

0
12

गडचिरोली,दि.२३: एका प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला डॉक्टरच्या तक्रारीवरुन आष्टी पोलिसांनी जिल्हा परिषद अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे यांच्यावर विनयभंग व अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षावर अशाप्रकारचा गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
आष्टी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला मुलचेरा तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. २० ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे हे संबधित प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देण्यासाठी गेले. आरोग्य केंद्राची पाहणी करुन कर्मचाऱ्यांची विचारपूस केल्यानंतर ते परत गेले. मात्र त्याच दिवशी संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास श्री.कुत्तरमारे यांनी संबंधित महिला डॉक्टरशी भ्रमणध्वनीवर संवाद साधला. काही वेळानंतर पुन्हा रात्री सव्वा नऊ वाजता श्री.कुत्तरमारे त्या महिला डॉक्टरशी बोलले. श्री.कुत्तरमारे हे आपल्याशी अभद्र व जातिवाचक बोलल्याची माहिती संबंधित महिला डॉक्टरने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर काल(ता.२२) महिला डॉक्टरने आष्टी येथील पोलिस ठाण्यात तक्रार केली. तक्रारीवरुन पोलिसांनी जिल्हा परिषद अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे यांच्यावर भादंवि कलम ३५४ व अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला, अशी माहिती पोलिस निरीक्षक उमेश बेसरकर यांनी दिली.