साईबाबा, प्रशांत राही, हेम मिश्रा यांची न्यायालयात हजेरी

0
5

गडचिरोली दि.२८: नक्षल्यांना मदत करीत असल्याच्या संशयावरुन पोलिसांनी अटक केलेले व सध्या जामिनावर असलेले दिल्ली विद्यापीठाचा प्रो. जी. एन. साईबाबा, हेम मिश्रा व प्रशांत राही यांना मंगळवारी गडचिरोली न्यायालयात हजर करण्यात आले.
गडचिरोली पोलिसांनी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचा विद्यार्थी हेम मिश्रा याला ऑगस्ट २0१३ मध्ये महेश तिरकी व पांडू नरोटे या दोन युवकांसह अटक केली होती. हेम मिश्राच्या माहितीवरुन पोलिसांनी प्रशांत राही व त्यानंतर ९ मे २0१४ रोजी पोलिसांनी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचा प्रो.जी.एन. साईबाबा यालाही अटक केली. वर्षभर तुरूंगात घालविल्यानंतर प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणावरून उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने साईबाबाला तीन महिन्यांचा तात्पुरता जामीन दिला. पुढे ४ सप्टेंबर रोजी ३१ डिसेंबरपर्यंत जामीन वाढविण्यात आला. मंगळवारपासून या प्रकरणाची सुनावणी गडचिरोली जिल्हा व सत्र न्यायालयात सुरु करण्यात आली. तिघांनी न्यायालयात हजेरी लावली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी हेम मिश्रा, महेश तिरकी व पांडू नरोटे यांच्या अटकेच्या वेळी जप्त केलेल्या वस्तूंबद्दल माहिती घेऊन एका साक्षीदाराचा जबाब नोंदविला. सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील अँड. सत्यनाथन, अँड. सचिन कुंभारे, अँड. अनिल प्रधान, तर आरोपींच्या वतीने अँड. सुरेंद्र गडलिंग, अँड. जगदीश मेश्राम व अँड. सुखदेवे यांनी काम पाहिले.