उमरखेड तालुक्यात अतिवृष्टीने शेती व घरांचे मोठे नुकसान

0
16

– एक हजार हेक्टर शेतजमीन आणि 113 घरांचे नुकसान
– दराटी, कृष्णापूर, पिरंजी, उमरखेडला जास्त फटका

उमरखेड-सतत तीन दिवस झालेल्या संततधार पावसाने, तसेच काही ठिकाणी झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे तालुक्यातील एक हजार हेक्टर शेतजमीन खरडून जाऊन, 113 घरांचेही नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शुक‘वार, 20 ऑगस्टला दराटी, कृष्णापूर, पिरंजी या गावांना आमदार नामदेव ससाने यांनी भेट दिली.

यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार राजेंद्र नजरधने, तहसीलदार आनंद देऊळगावकर यांच्यासह प्रशासकीय कर्मचारी व गावकरी उपस्थित होते. यावेळी आ. ससाने यांनी नागरिकांच्या व्यथा जाणून घेतल्या असून तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश देत लवकरात लवकर शासनाकडून नुकसानभरपाई मिळवून देण्याचे अभिवचन दिले.

तालुक्यात महिनाभर पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र 16 ऑगस्टपासून दमदार पाऊस सुरू झाल्याने शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. परंतु दुसर्‍याच दिवशी, 17 ऑगस्टला मध्यरात्री तालुक्यातील दराटी, कृष्णापूर, पिरंजी या तीन गावांवर झालेल्या अतिवृष्टीने व गावाजवळच्या नाल्याच्या पुरामुळे दराटीच्या 75 घरांत पाणी शिरले असून शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. तसेच उमरखेडमध्ये लेंडी नाल्याच्या पुरामुळे नाल्याच्या बाजूच्या घरांमध्ये पाणी शिरले होते.

या प्रकोपामुळे दराटी व कृष्णापूर येथील अनेक गरीब कुटुंबांचे संसार उघड्यावर आले असून त्यांच्या घरातील अन्नधान्य, कपडे वाहून गेल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तर अतिवृष्टीने शेतातील पिकांचे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना संकटात ओढले असून नुकसानभरपाई त्वरित मिळण्याची मागणी आ. ससाने यांनी केली आहे.

अतिवृष्टी झालेल्या तसेच नदीनाल्यांच्या पुरामुळे शेतात पाणी जाऊन पिकाचे नुकसान झालेल्या भागाचे सर्वेक्षण सुरू असून पुरामुळे घरात पाणी घुसल्याने झालेल्या नुकसानाचेसुद्धा पंचनामे सुरू आहेत. शासनाच्या निर्णयानुसार नुकसानग‘स्तांना त्वरित मदत देण्यात येईल, असे तहसीलदार आनंद देऊळगावकर यांनी सांगितले.

अफवांवर विश्वास ठेवू नका : निवासी उपजिल्हधिकारी
पुरामुळे जनावरांचे नुकसान झालेले नाही. नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे करण्याची करण्याची कार्यवाही सुरू आहे. समाजमाध्यमांवर या संदर्भात दिशाभूल करणार्‍या व अफवा पसरवणार्‍या वृत्तांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन यवतमाळ जिल्हा निवासी उपजिल्हाधिकारी ललित वर्‍हाडे यांनी केले आहे.