जानेवारीत सुरू होणार अहेरी नजीकच्या वांगेपल्ली पुलाचे काम

0
13

अहेरी दि. १३-: तेलंगणा व महाराष्ट्रातील अहेरी तालुक्याला जोडणाऱ्या वांगेपल्ली नदीवरील पूल मंजूर झाला आहे. या पुलामुळे अहेरी ते कागजनगर हे अंतर केवळ ५० किमीवर राहणार आहे. या पुलामुळे महाराष्ट्र व तेलंगणा राज्य जोडले जाणार असून येत्या जानेवारी महिन्यात या पुलाच्या कामाला प्रत्यक्ष सुरूवात होईल, अशी माहिती तेलंगणाच्या कागजनगरचे आमदार कोनप्पा यांनी दिली.

अहेरी येथील रूक्मिणी महालात गुरूवारी आमदार कोनप्पा यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांची भेट घेतली व त्यांच्याशी प्रश्नासह विविध मुद्यांवर चर्चा केली. मागील ३०-४० वर्षांपासून वांगेपल्ली पुलाचा प्रश्न प्रलंबित होता. तेलंगणा व महाराष्ट्र राज्याला अहेरी तालुक्यातून जोडणारा हा पूल आता मंजूर झाला आहे. या पुलामुळे अहेरी ते कागजनगर हे अंतर केवळ ५० किमीवर येणार आहे.

१८० किमी अंतराचा हा परिघ केवळ ५० किमीवर येणार असल्याने तेलंगणा व महाराष्ट्रातील जनतेला याचा मोठा फायदा होणार आहे. सदर पुलाच्या बांधकामासाठी तेलंगणा सरकारने पुढाकार घेतला असून ९५ कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. व याचे कामही मोठ्या कंपनीकडे सोपविण्यात आले आहे. येत्या जानेवारी महिन्यात या कामाला प्रत्यक्ष सुरूवात होणार असल्याचे कोनप्पा यांनी नामदार आत्राम यांना सांगितले. या कामाला महाराष्ट्र सरकारच्या वतीने सर्व सहकार्य केले जाईल, अशी माहिती नामदार अम्ब्रीशराव आत्राम यांनी दिली.