रस्त्याच्या बांधकामाचा ठराव मार्चमध्येच पारित; केवळ प्रसिद्धीसाठी काँग्रेसचे भजन आंदोलन

0
26
 फाइल पाच महिन्यांपासून जिल्हाधिकारी कार्यालयात पडून


चंद्रपूर, ता. २४ : चंद्रपूर शहरातील विविध रस्त्यांची कामे नागरी दलित वस्ती सुधार योजनेतून करण्यासाठी महानगर पालिकेच्या चार सदस्यीय समितीने २९ मार्च २०२१ रोजी ठराव पारित केला. ३१ मार्च २०२१ रोजी सदर रस्त्याच्या कामाची फाईल मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवली. त्यामुळे येत्या काळात रस्त्याची कामे होणार आहेत. असे असतानाही केवळ राजकीय भावनेतून आणि प्रसिद्धीसाठी काँग्रेसच्या वतीने मंगळवार, दि. २५ ऑगस्ट रोजी खड्डयांविरोधात भजन आंदोलन करण्यात आले, अशी टीका मनपाच्या सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

शहरातील बागला चौक ते अंचलेश्वर गेटदरम्यानच्या मार्गाची दुरुस्ती करण्यासाठी यापूर्वीच नागरी दलित वस्ती सुधार योजनेतून ठराव पारित करण्यात आला आहे. सदर रस्त्याच्या कामाची फाईल मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविण्यात आली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांची स्वाक्षरी झाल्यानंतर बांधकामाचे कार्यादेश निघेल. मागील पाच महिन्यांपासून जिल्हाधिकारी कार्यालयात फाइल पडून असल्याने रस्त्याचे काम थांबले आहे, ही वस्तुस्थिती विरोधी पक्षाच्या काँग्रेस नेत्यांना माहिती आहे. तरीही केवळ जनमानसात मनपाच्या कामाबद्दल गैरसमज निर्माण करण्यासाठी काँग्रेसने भजन आंदोलन केले.  शहरातील बागला चौक ते अंचलेश्वर गेट दरम्यानच्या रस्त्याची दुरुस्ती जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळताच होईल. रस्त्याचे नुतनीकरण झाल्यानंतर बाबूपेठ, लालपेठ, रयतवारी, महाकाली वॉर्ड, भिवापूर येथील नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. येथील नागरिकांच्या सोयीसाठी महानगरपालिका कार्यतत्पर असून, सर्व रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार आहे.