कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत वाशिम जिल्हा अग्रेसर

0
14
  • अमरावती विभागात अव्वल कामगिरी
  • १८ वर्षांवरील सुमारे ३८ टक्के व्यक्तींचे लसीकरण
  • जिल्ह्यात कोरोना लसीचे आणखी ६० हजार डोस उपलब्ध

वाशिम, दि. ३१ :  कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेवून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम गतिमान करण्यावर भर दिला जात आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणामध्ये अमरावती विभागामध्ये वाशिम जिल्हा अग्रेसर असून जिल्ह्यातील १८ वर्षांवरील सुमारे ३८ टक्के व्यक्तींचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण झाले आहे.

सध्या कोरोना विषाणू संसर्गाचे प्रमाण कमी झाले असले तरी आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. केरळसह इतर काही राज्यांमध्ये कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम अधिक गतिमान करण्यावर वाशिम जिल्हा प्रशासनाने भर दिला आहे. शहरी व ग्रामीण भागामध्ये सुरु असलेल्या लसीकरण केंद्रांवर १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जात आहे. याकरिता जिल्ह्यामध्ये पुरेशा प्रमाणात लसींची उपलब्धता आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत १८ ते ४४ वर्षे वयोगटातील १ लाख ६८ हजार ६७३ जणांचे म्हणजेच पात्र लोकसंख्येच्या २८ टक्के लसीकरण करण्यात आले आहे. तसेच ४५ वर्षांवरील २ लाख २३ हजार ८९० व्यक्तींचे म्हणजेच पात्र लोकसंख्येच्या ५४ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. १८ वर्षांवरील एकूण पात्र लोकसंख्येपैकी ३ लक्ष ९२ हजार ५६३ म्हणजेच ३८.१३ टक्के लसीकरण पूर्ण झाले असून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये अमरावती विभागामध्ये वाशिम जिल्हा अग्रेसर आहे. १८ वर्षांवरील व्यक्तींचे अमरावती जिल्ह्यात २९.३४ टक्के, बुलडाणा जिल्ह्यात २९.४१ टक्के, अकोला जिल्ह्यात २८.९८ टक्के व यवतमाळ जिल्ह्यात २९.७३ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.

तिसऱ्या लाटेपासून बचावासाठी लस घेण्याचे आवाहन

कोरोना विषाणू संसर्गाचे प्रमाण सध्या कमी आहे. मात्र, येत्या काही दिवसांमध्ये कोरोना विषाणूची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात असून काही राज्यांमध्ये कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेपासून बचावासाठी कोरोना प्रतिबंधक लस उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात लसीकरण मोहीम गतिमान करण्यात आली आहे. सद्यस्थितीत कोरोना प्रतिबंधक लसीचे ६० हजार डोस उपलब्ध झाले असून लवकरच आणखी २० हजार डोस उपलब्ध होतील. जिल्ह्यातील १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींनी नजीकच्या लसीकरण केंद्रावर जावून कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी. तसेच दुसऱ्या डोससाठी पात्र असलेल्या व्यक्तींनी सुधा विहित कालावधीत लसीचा दुसरा डोस घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले आहे.

कोरोना लसीकरण मोहिमेची जिल्हानिहाय आकडेवारी

जिल्हा १८ वर्षांवरील

पात्र लोकसंख्या

आतापर्यंत झालेले लसीकरण टक्केवारी
अकोला १५०१५३४ ४३५०७० २८.९८%
अमरावती २३६९७८७ ६९५३८७ २९.३४%
बुलडाणा २२०५६७६ ६४८७६८ २९.४१%
वाशिम १०२९४२३ ३९२५६३ ३८.१३%
यवतमाळ २३१४९२४ ६८८२६३ २९.७३%