सदृढ बालक हीच खरी देशाची संपत्ती- डॉ.नितीन कापसे

0
43

गोंदिया,दि.1 : गर्भवती महिलांच्या आहाराकडे कुटूंबियांनी सुरुवातीपासूनच लक्ष दिले पाहिजे. कारण सुदृढ बालक हीच खरी देशाची संपत्ती आहे. असे मत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन कापसे यांनी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून व्यक्त केले.
बाई गंगाबाई महिला व बाल रुग्णालय गोंदिया येथे राष्ट्रीय माता बाल संगोपन कार्यक्रमाअंतर्गत 1 ते 7 सप्टेंबर दरम्यान राष्ट्रीय पोषाहार सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे. त्यानुसार आज 1 सप्टेंबरला पोषाहार आरोग्य प्रदर्शनीचे उद्घाटन सविता विनोद अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन कापसे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरिश मोहबे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.सुशांकी कापसे,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.सुवर्णा हुबेकर, एस.एस.गर्ल्स कालेजच्याडॉ.कविता राजाभोज, बी.जी.डब्ल्यूचे मेट्रन गजानन खेडकर,  डॉ.अनिल परियाल,कार्यालय अधिक्षक अभिनव तराळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बोलतांना सविता अग्रवाल म्हणाल्या,राष्ट्रीय पोषाहार दिन हा एक दिवसापुरता मर्यादित न ठेवता तो संपूर्ण गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येक आदिवासी पाड्यापर्यंत पोहचवावा, जेणेकरुन गोंदियात शुन्य बालमृत्यू ही संकल्पना वास्तविकपणे अंमलात येईल असे त्यांनी सांगितले.
डॉ.मोहबे यावेळी म्हणाले, बाळाच्या आयुष्यातील सुरुवातीचे एक हजार दिवस खुप महत्वाचे असतात, त्यामुळे महिलांना पोषाहाराबाबत साक्षर बनविणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे कमी वजनाचे बाळ जन्माला येणार नाही व
कुपोषणमुक्त गोंदियाचे स्वप्न साकार होऊ शकेल असे त्यांनी सांगितले.
1 ते 7 सप्टेंबर दरम्यान राष्ट्रीय पोषाहार सप्ताह आयोजित करण्यात येत आहे त्याबाबत कार्यक्रमाची सविस्तर रुपरेषा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.सुवर्णा हुबेकर यांनी प्रास्ताविकातून सांगितली.
यावेळी यावर्षीच्या पोषाहार सप्ताहाचे घोषवाक्य ‘‘पोषणाच्या वाटेवर कुपोषणाची हार, करता स्थानिक आहाराचा स्विकार’’ याबाबत एनआरसी विभागाच्या आहार समुपदेशिका स्वाती बन्सोड यांनी पोषाहाराविषयी विस्तृतपणे माहिती
उपस्थित माता-पालकांना दिली.यावेळी गर्भवती मातांचे हिमोग्लोबीन व कॅल्शीयम लेवल वाढविण्यासाठी डॉ.सुवर्णा हुबेकर यांनी स्थानिक उपलब्ध आहारातून पोषक तत्त्वे कशी मिळविता येईल याचे सोप्या शैलीत माता-भगिनींना समजावून सांगितले. डॉ.कविता राजाभोज यांनी पोषाहार साक्षरता ही काळाची गरज असल्याचे महत्व विषद केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एनआरसीच्या स्टाफ स्वाती बावणकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार सारीका तोमर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एन.आर.सी.स्टाफ अनिता राहूलकर व रजनी वैद्य यांनी परिश्रम
घेतले.