डेकोरेशन संबंधित शेकडो व्यवसायिक धडकले कचेरीवर

0
48

भंडारा-दोन वर्षापासून सातत्याने बेरोजगारी व उपासमारीची मार झेलणा-या साऊंड सिस्टम, मंडप डेकोरेशन, कॅटरिंग व डीजे व्यावसायिकांचा त्यांच्या विविध मागण्यांना घेऊन 3 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी ‘आम्हाला पैसा नको पण कार्यक्रमाची परवानगी द्या’ अशी एकच मागणी लावून धरण्यात आली. कोरोनामुळे मागील दोन वर्षापासून सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी आली आहे. जिल्ह्यात साऊंड सिस्टम, मंडप डेकोरेशन, धुमाल पार्टी, कँटरिंग, डीजे, फुलांची सजावट, आकेस्ट्रा गायन, वादन या व्यवसायाशी संबंधित जवळपास 16 हजारावर लोकांना स्वयंरोजगार प्राप्त झाला आहे. तर त्यांच्या या कामात हजारोच्या संख्येत इतर मजुरांनाही काम मिळते. पंरतु कोरोनानंतर जिल्हा प्रशासनातर्फे या व्यावसायिकांच्या समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे सदर कामाशी संबंधित व्यावसायिकांवर बेरोजगारची व उपासमारीची वेळ आली आहे. यांसदर्भात अनेकदा निवेदन देऊनही कोणताच तोडगा काढण्यात आलेला नाही.
आपल्या न्याय मागणीकरिता भंडारा जिल्हा साऊंड सिस्टम, मंडप डेकोरेशन, धुमाल, कँटरिंग, डीजे असोशिएशनच्या नेतृत्वात शुक्रवार 3 सप्टेंबर रोजी धडक मोर्चा काढण्यात आला. शास्त्री चौकातून मोर्चाला सुरूवात होऊन जिल्हाधिकारी कार्यालया मोर्चा नेऊन येथे सभा घेण्यात आली. इतर व्यावसायिकांना राज्य शासनातर्फे आर्थिक मदत देण्यात आली. इतरांप्रमाणे आम्हाला मदतीची अपेक्षा नाही, पण कामाची परवानगी देण्यात यावी, अशी मागण्ी लाऊन धरण्यात आली. यानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी संदीप कदम यांना देण्यात आले. या मोर्चात विरेंद्र मुटकुरे, उपाध्यक्ष सतेंद्र बुंदेला, सचिव शोभाराम तिजारे, प्रकाश हारगुळे, अजित गायधने, सावरकर, दीपक शहारे, शोभिवंत गेडेकर, संतोष वहिरे, गणेश कर्कर, सुनील चिंधालोरे यांच्यासह शेकडोच्या संख्येने व्यावसायिक व मजूर सहभागी झाले होते.