खापरवाडा येथील युवक वाहून गेला तर अमरावती जिल्ह्यात पूरात अडकलेल्या 16 जणांना काढले बाहेर

0
9
एसडीआरएफ पथकाव्दारे शोध कार्य सुरु
अकोला/अमरावती,दि.9-  अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्यातील कुरुम मंडळामध्ये 69.8 एमएम पर्जन्यमानाची नोंद झाली असून मौजे खापरवाडा येथील 28 वर्षीय नंदकिशोर तुळशीराम टापरे हे उमा नदीवरील पुलावरुन पाय घसरुन वाहुन गेले आहे. त्यांचे शोध कार्य एसडीआरएफ पथकाव्दारे सुरु आहे.
यासंदर्भात जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, अकोला तालुक्यातील सर्व नदी नाल्यांना पूर आला आहे. काटेपूर्णा नदीमध्ये वाहुन गेलेल्या दोन मुलांचे शोध कार्य सुरु असुन त्यापैकी एका व्यक्तीचा मृतदेह मिळाला आहे व एकाचा शोध कार्य सुरु आहे. एसडीआरएफ नागपूर पथकाव्दारे काटेपुर्णा नदीमध्ये वाहुन गेलेल्या मुलाच्या शोध कार्य सुरु आहे. ग्रांधीग्राम येथील पुर्णा नदीच्यापुलावरुन पाणी जात होते. सद्यास्थितीत अकोला-अकोट रस्ता बंद आहे. तर अकोला- म्हैसांग- दर्यापूर हा मार्ग आज दुपारपासून सुरु झाला आहे. तालुक्यात आज 18.4 एमएम पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.
बार्शी टाकळी तालुक्यातही सर्व नदी नाल्यांना पूर आला आहे तथापि, कोणत्याही गावाचा संपर्क तुटल्याचे वृत्त नाही. महान येथील काटेपुर्णा मोठया प्रकल्पातुन 51.16 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे काटेपुर्णा नदीला पुर आहे. तालुक्यात आज 11 एमएम पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.अकोट तालुक्यातही सर्व नदी नाल्यांना पूर आला असून कोणत्याही गावाचा संपर्क तुटलेला नाही. तालुक्यात आज 11 एमएम पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.तेल्हारा तालुक्यातही सर्व नदी नाल्यांना पूर आला असून नेर, सांगवी, पिवंदळ या गावांचा संपर्क तुटला आहे. सद्यास्थितीत पुराचे पाणी कमी झाल्यामुळे पुर्वपदावर येत आहे. वान प्रकल्पातून 46.24 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तालुक्यात आज 18.5 एमएम पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.बाळापूर तालुक्यातही सर्व नदी नाल्यांना पूर आला असून शेगाव-निंबा अकोट या मार्गावरील अंदुरा येथे पुलावरुन पूर्णा नदीचे पाणी वाहत असून सद्यास्थितीत रस्ता वाहतुकीसाठी सुरु आहे. हाता येथेही काही घरांमध्ये पाणी गेले आहे. तालुक्यात आज 18.5 एमएम पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.पातुर तालुक्यातही सर्व नदी नाल्यांना पूर आलेला असून कोणत्याही गावाचा संपर्क तुटल्याचे वृत्त नाही. तालुक्यात आज 6.7 एमएम पर्जन्यमानाची नोंद झाली आहे, असे कळविण्यात आले आहे.
अमरावती जिल्ह्यात पूरात अडकलेल्या 16 जणांना काढले बाहेर,100 व्यक्तीना हलवले
अमरावती —शहरातील बडनेरा व इतर भागात पावसाचे पाणी शिरले असता, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या जवानांनी मौजा बडनेरा येथे पावसाच्या पाण्यात अडकलेल्या 100 व्यक्तींना सुखरुप बाहेर काढले. बडनेरा येथील झरी मंदीरात या सर्वांना स्थलांतरीत करण्यात आले, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती कक्षाने आज दिली.
तिवसा तालुक्यातील मौजा भिवापूर येथील तलावात 6 युवक अडकले होते. या 6 युवकांना आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या चमुने बाहेर काढले. मौजा शिवणगाव येथे नदीला पुर आल्यामुळे तेथील 30 लोक शिवणगाव येथे जाऊ शकले नाही, त्याकारणाने प्रशासनाने त्यांची फत्तेपुर येथील समाज मंदीरात राहण्याची व्यवस्था केली. तिवसा तालुक्यातील कौंडण्यपूर येथील वर्धा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे कुऱ्हा ते आर्वी या पुलावरुन पाणी जात असल्यामुळे या मार्गावरील वाहतुक सध्या बंद करण्यात आली आहे.
भातकुली तालुक्यातील इब्राहिमपुर, बहादरपुर, दाढी, पेढी या गावांतील नाला रस्त्यावरुन वाहत असल्याने यादरम्यान गावाशी संपर्क तुटला होता. बहादरपुर येथे जाण्यासाठी निघालेल्या 9 नागरिकांना पुलावरुन पाणी वाहत असल्याने अलिकडच्या खरबी या गावातील जिल्हा परिषद परिसरात निवारा देण्यात आला. आता तेथील परिस्थिती सामान्य झाली असल्याची माहीती आहे.
चांदूर रेल्वे तालुक्यातील चांदूर-राजुरा रस्त्यावरुन दोन नाल्याच्या प्रवाहामध्ये 8 इसम अडकले होते व येथील त्रिवेणी संगम एकपाला मंदीरात 3 अडकलेल्या व्यक्तींना आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांनी सुखरुप बाहेर काढले. अमरावती तालुक्यातील रोहणखेडा, पर्वतापुर, शेवती या गावाचा पावसामुळे संपर्क तुटला होता. तिवसा येथील मोजा ठाणाठुणी गावातील काही घरांमध्ये पाणी शिरले आणि येथील शिवणगांवच्या सुर्यगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गावाचा संपर्क तुटला होता. परंतु आता तेथील परिस्थिती सामान्य झालेली आहे. मोजा जहागीरपुर येथील काही घरांमध्ये पाणी शिरले त्याबाबत पंचनामे सुरु आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी पवनित कौर यांनी दिली आहे.

दुसऱ्या दिवशीही जळगाव जामोद-नांदुरा मार्ग वाहतुकिसाठी बंद…
पुर्णेच्या पुलावरून वाहतय आठ ते दहा फूट पाणी…

जळगाव जा :-पुर्णा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढल्याने माणेगाव-येरळीच्या मधोमध असलेल्या पुर्णा नदिच्या पुलावरून आठ ते दहा फूट पाणी वाहत असल्याने आज सलग दुसऱ्या दिवशीही जळगाव जामोद-नांदुरा मार्गावरील वाहतूक पुर्णतः बंद आहे.
गेल्या दोन ते तीन दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये कमी अधिक प्रमाणात जोरदार पाऊस सुरू असून लहान मोठ्या नदी-नाल्यांना पूर आलेला आहे.पुर्णा नदिचा उगम मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील सातपुड्याच्या डोंगरातून झाला असून नदिच्या उगमस्थानावरही पावसाची संततधार सुरूच आहे.पुर्णा नदी अमरावती,अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातून जात असून जळगाव जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र मुक्ताबाई येथे तापी नदीला येवून मिळते.त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यलगत असलेल्या अमरावती, अकोला जिलह्यातही जोरदार पाऊस सुरू असून तीकडल्या नदी – नाल्यांचा पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात पुर्णेच्या नदि पात्रात होत आहे.अकोला-बुलढाणा जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या वारी हनुमान धरनातूनही मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्या जात असल्याने पुर्णेच्या नदीपात्रात पाण्याची आवक वाढली आहे.त्यामुळे पुर्णा नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे.तर दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातील हतणूर धरणाचे सर्वच वक्रद्वार पुर्ण क्षमतेन उघडले असून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.एकंदरीतच नदीपात्रात पाण्याची आवक वाढल्याने पुर्णा नदीला मोठा पूर आला असून माणेगाव येरळी जवळील पुलावरून आठ ते दहा फूट पाणी वाहत आहे…काल सकाळपासूनच पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक पुर्णतः बंद झाली आहे.लोकांनी पूर पाहण्यासाठी गर्दी करु नये, कोणताही अनुचित प्रकार त्याठिकाणी घडू नये यासाठी जळगाव जामोदचे ठाणेदार सुनील अंबुलकर साहेब लक्ष ठेवून असून पोलीस प्रशासनाचे कर्मचारी कालपासूनच पुर्णा नदीपात्राजवळ बंदोबंदस्थासाठी हजर आहेत.नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची वाढ होत असून नदिकाठावरील गावांना सर्तकतेचा ईशारा स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आला आहे.