आठ दिवसात कारवाई न झाल्यास आंदोलन

0
35

– चुरचुरा येथील अवैध वृक्षतोड प्रकरण, गावकर्‍यांचा इशारा
गडचिरोली-तालुक्यातील चुरचुरा-अमिर्झा मार्गावरील वनराईने संपन्न असलेल्या कु. नो. 54 येथे गडचिरोलीच्या गायत्री फुलझेले व तिच्या दोन मुलांनी 30 एकर परिसरात जेसीबी व पोकलँड मशीनच्या सहाय्याने वृक्षतोड केली. तसेच वृक्षतोड झालेल्या झाडांचे तुकडे करून जमिनीत पुरले. या प्रकरणी तक्रार करूनही याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने यांच्यावर येत्या आठ दिवसांत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा चुरचुरा येथील वन व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व गावकर्‍यांनी पत्रपरिषदेतून दिला आहे.
सदर परिसर जंगलव्याप्त असल्याने या ठिकाणी वाघ व वन्य प्राण्याचे वास्तव असते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वनसंपदा होती. मात्र, वृक्षतोडीमुळे ती नष्ट झाली आहे. वृक्षतोड करणार्‍या फुलझले यांनी आपल्या सहा एकर शेतातील झुडूपी जंगल तोडण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र, त्यांनी याचाच फायदा घेऊन 30 एकर परिसरातील वृक्षतोड करून शेती उठविली आहे. याबाबत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व वनविभागाच्या उपवनसंरक्षकांकडे निवेदनातून तक्रार केली आहे. मात्र, अजूनपर्यंत कसलीही कारवाई झालेली नाही.
त्यामुळे येत्या आठ दिवसात आरोपींना अटक करण्यात यावी, या प्रकरणात दोषी वन विभागातील कर्मचार्‍यांवर कारवाई करावी, गायत्री फुलझले यांना सरकारी सेवेतून बडतर्फ करावे, झालेल्या नुकसानीची भरपाई आरोपींकडून घेण्यात यावी, वृक्षतोड झालेल्या ठिकाणी वृक्षतोड करण्यात यावे आदी मागण्यांसाठी आंदोलन छेडण्याचा इशारा वन समितीचे उपाध्यक्ष नामदेव खोब्रागडे, रामचंद्र नैताम, देवेंद्र म्हशाखेत्री, रुपचंद सिडाम, पोलिस पाटील गोपिका सयाम, ग्रामपंचायत सदस्य नलिना म्हशाखेत्री, महादेव गेडाम, मनोहर राऊत, पुरुषोत्तम अलाम आदींनी दिला आहे.